वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना रंगेहात पकडले.
वर्धा: ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम राबवत अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारूच्या भट्ट्यांवर छापा टाकला. या कारवाईत ५ लाख ९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शेतातील नाल्यालगत सुरू होती दारूची भट्टी
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा धोत्रा शेत शिवारातील नाल्यालगत छापा टाकला. यावेळी आरोपी प्रफुल विक्रम कांबळे, गजानन रामचंद्र कोपरकर आणि यश गंगाधर वानखेडे (तिन्ही राहणार तळेगाव टा., जि. वर्धा) हे संगनमताने मोठ्या प्रमाणावर मोहफुलाची दारू गाळताना रंगेहात मिळून आले.
जप्त केलेला मुद्देमाल:
पोलिसांनी घटनास्थळावरून खालील साहित्य जप्त केले आहे:
- ४,४०० लिटर मोहा सडवा रसायण
- १६८ लिटर तयार गावठी मोहा दारू
- २३ ड्रम, गुळ आणि दारू गाळण्याचे इतर साहित्य
- एकूण किंमत: ५,०९,४०० रुपये
पोलिस पथकाची कामगिरी
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित आणि अभिषेक नाईक यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन अल्लीपूर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या