पाणीपुरवठा योजनेसह प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार; विकासकामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याचे कडक निर्देश
वडगाव मावळ (प्रतिनिधी: अमोल जाधव):
वडगाव शहराचा सुनियोजित विकास आणि नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा अबोलीताई मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली वडगाव नगरपंचायतीची सविस्तर प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शहराच्या ४० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला असून, विकासकामांच्या दर्जात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम आमदारांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिला आहे.
पाणीपुरवठा योजनेचे ६०% काम पूर्ण
शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या ६०% पूर्ण झाले आहे. या कामाच्या प्रगतीबद्दल सर्व नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले असले तरी, ही योजना विहित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी दिल्या.
बाजारपेठ रस्ता रुंदीकरण व आरक्षणाबाबत महत्त्वाचे निर्णय
वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्ता रुंदीकरण करू नये, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. यावर सकारात्मक चर्चा करून रस्ता रुंदीकरण न करण्याच्या तसेच जैन मंदिर येथील आरक्षण तत्काळ रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि सूचना:
- महिला सक्षमीकरण: महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे.
- शहरी सुशोभीकरण: दत्त मंदिर परिसरातील अभ्यासिका, नमो उद्यान अंतर्गत शहरातील मोकळ्या जागांचे सुशोभीकरण आणि नवीन उद्यानांची निर्मिती करणे.
- नागरी सुविधा: भाजी मंडई, सीसीटीव्ही यंत्रणा, बस स्टॉप दुरुस्ती, ओपन जिम आणि वैकुंठरथ या सुविधा प्राधान्याने मार्गी लावणे.
- ज्वलंत प्रश्नांवर चर्चा: शहरात उद्भवणारी वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पार्किंगची समस्या, अतिक्रमण आणि कातवी येथील स्मशानभूमीचा प्रश्न यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश.
ज्येष्ठ नागरिक व युवकांसाठी खास नियोजन
शहरातील खेळाडूंसाठी क्रीडांगण, ज्येष्ठांसाठी 'नाना-नानी पार्क' आणि अद्ययावत गार्डनसाठी जागेचे तत्काळ सर्वेक्षण करून अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच हॉकर्ससाठी स्वतंत्र 'हॉकर्स झोन' निर्माण करण्याबाबतही चर्चा झाली.
या बैठकीस मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. "वडगावच्या सर्वांगीण आणि सुनियोजित विकासासाठी आम्ही सर्वतोपरी कटिबद्ध आहोत," असा विश्वास यावेळी आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या