1 लाख 27 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 122 कोटी जमा
उर्वरीत मदत खात्यात तातडीने जमा करण्याची कारवाई
सचिन हाडके
जिल्हा प्रतिनिधी
वर्धा, दि.4 अतिवृष्टी, पुरपरिस्थिती, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात जुन ते सप्टेबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील अशा 2 लाख 56 हजार शेतकऱ्यांना मदत वितरणासाठी 226 कोटी 92 लक्ष रुपये प्राप्त झाले आहे. त्यापैकी कालपर्यंत 1 लाख 27 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 122 कोटी 26 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. उर्वरीत वितरण युध्दपातळीवर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहे.
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 874.05 मिलीमीटर आहे. यावर्षी सततच्या अतिवृष्टीमुळे 1015.03 मिलीमीटर पर्जन्यमान झाले असून टक्केवारी 116.1 टक्के इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतीपिके, मनुष्यहानी, पशुहानी, घरे व गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करुन शासनस्तरावर निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सदर निधी प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात जुन व जुलै या कालावधीत अतिवृष्टी, पुरपरिस्थितीमुळे 3 हजार 679 शेतकऱ्यांचे 2 हजार 744 हेक्टर पिकांचे निकसान झाले होते. यासाठी 2 कोटी 33 लाख 57 हजार इतका निधी प्राप्त झाला. यापैकी 3 हजार 69 शेतकऱ्यांना 2 कोटी 7 लाख 75 हजार निधी वितरीत करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात 9 हजार 383 शेतकऱ्यांच्या 6 हजार 594 हेक्टर पिकांचे निकसान झाले. यासाठी 5 कोटी 60 लाख 90 हजार प्राप्त झाले असून त्यापैकी 7 हजार 395 शेतकऱ्यांना 4 कोटी 75 लाख 11 हजाराचे वितरण करण्यात आले आहे.
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे तब्बल 2 लाख 43 हजार 198 शेतकऱ्यांच्या 2 लाख 72 हजार 972 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरणासाठी 218 कोटी 97 लाख 97 हजार इतका निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 17 हजार 132 शेतकऱ्यांच्या खात्यात 115 कोटी 43 लाख 96 हजार इतका निधी जमा करण्यात आला आहे. याप्रमाणे जुन ते सप्टेंबर या कालावधीत नुकसानग्रस्त एकून 1 लाख 27 हजार 596 शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 122 कोटी 26 लाख 84 हजार जमा करण्यात आले आहे. उर्वरीत वाटप युध्दपातळीवर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहे.
मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना 40 लाखाची मदत
अतिवृष्टीमुळे वीज पडून, पुरात वाहून गेल्याने जिल्ह्यात मृत्यू झालेल्या 10 व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 40 लाख रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे. वीज पडून जखमी झालेल्या आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 9 व्यक्तींना 80 हजार 400 रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे.
घरे, गोठ्यांच्या नुकसानीसाठी अनुदान
जिल्ह्यात जुन ते सप्टेंबर या कालावधीत वीज पडून, पुरात वाहून एकूण 74 लहान व मोठे जनावरे मृत पावली. या जनावर मालकांना 13 लाख 4 हजार इतकी मदत वाटप करण्यात आली आहे. अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे घरात पाणी शिरुन नुकसान झालेल्या व्यक्तींना प्रतिकुटुंब 10 हजार याप्रमाणे 188 कुटुंबांना 11 लाख 80 हजार इतक्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. अंशत: व पुर्णत: नुकसान झालेल्या एकूण 757 घरे व 44 गोठ्यांच्या नुकसानीसाठी 40 लाख 43 हजार इतक्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या