Type Here to Get Search Results !

आचारसंहिता लागू महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी



         सचिन हाडके           

        जिल्हा प्रतिनिधी

राज्याच्या राजकीय वातावरणात रंग चढवणारी बातमी अखेर आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज (४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजवला आहे. यासोबतच राज्यभर आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे.


राज्यातील अनेक नगरपालिका आणि नगरपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्येच संपला होता. मात्र, कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षण वादामुळे निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या गेल्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जानेवारी २०२६ पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया गतीमान झाली आहे.


राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली की, पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. अधिसूचना आजच (४ नोव्हेंबर) जारी होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर, मतदान २ डिसेंबर, आणि मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल.


यंदाच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षांची थेट निवडणूक होणार आहे, ही बाब राजकीय समीकरणांना नवे वळण देणार आहे. स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि पक्षांतर्गत गटबाजी नव्याने आकार घेण्याची शक्यता आहे

 राज्य निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपला प्रचार मोड ऑन केला आहे. उमेदवारांच्या घोषणांपासून ते आघाड्यांच्या चर्चांपर्यंत, पुढील काही दिवस महाराष्ट्रात स्थानिक राजकारणाचे तापलेले वातावरण पाहायला मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या