Type Here to Get Search Results !

वर्धा शहर पोलिसांचा दणका; अवैध दारू तस्करी रॅकेटचा पर्दाफाश ₹11.20 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक; वाहन मालक फरार

  


  सचिन हाडके

जिल्हा प्रतिनिधी 


वर्धा :-  शहर पोलिसांनी अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कारसह तब्बल ₹11 लाख 20 हजार किमतीचा अवैध विदेशी दारूचा साठा जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे, तर वाहन मालक फरार आहे.

शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विशाल सवाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धुणीवाले चौक येथे नाकाबंदी करण्यात आली. शुक्रवारी (दि. 27) सकाळी 11.55 वाजता पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर (MH-31-C-9959) संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन भरधाव वेगाने पळवले. पोलिसांनी पाठलाग करून ईसावा ले-आउट, विकास विद्यालयाच्या मागे, गांधीनगर येथे वाहन अडवले.

वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी दारू आढळून आली. या प्रकरणी आसिफ खान अकबर खान पठाण (वय 32, रा. आनंदनगर, वर्धा) याला अटक करण्यात आली असून बादल धवणे (वय 33, रा. वर्धा) हा वाहन मालक फरार आहे.

जप्त मुद्देमाल (एकूण ₹11,19,200):

स्विफ्ट डिझायर कार – ₹8,00,000

रॉयल स्टॅग विदेशी दारू – 9 पेट्या – ₹1,51,200

ओल्ड मंक विदेशी दारू – 7 पेट्या – ₹1,00,800

ओसी ब्लू विदेशी दारू – 5 पेट्या – ₹67,200

सर्व जप्ती पंचांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे करून मुद्देमाल सील करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कलम 65(A), 65(E), 77(A), 83 तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम 181, 130, 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या देखरेखीखाली PSI विशाल सवाई व त्यांच्या पथकाने केली. या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या