वडगावमधील १३ ठाकर कुटुंबांचा वनवास संपला; नगराध्यक्षा अबोलीताई ढोरे यांच्या हस्ते जातीच्या दाखल्यांचे वाटप
आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया प्रतिष्ठानचा पुढाकार; वर्षानुवर्षांचा प्रश्न मार्गी
अमोल जाधव
(मुंबई ईस्ट वार्ताहर)
वडगाव मावळ (प्रतिनिधी
वडगाव शहरातील ठाकर समाजातील बांधवांच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नाला अखेर यश आले आहे. मावळचे जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या माध्यमातून, मोरया प्रतिष्ठानच्या सहकार्याने वडगावमधील सुमारे १३ कुटुंबांना नुकतेच जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. वडगाव नगरपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. अबोलीताई मयूर ढोरे यांच्या शुभहस्ते हे दाखले सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक अजय भवार, नगरसेवक गौतम सोनवणे, मोरया प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कागदपत्रांची अडचण आणि पाठपुरावा
ठाकर, आदिवासी आणि कातकरी समाजातील अनेक बांधव आजही जातीच्या दाखल्यांपासून वंचित आहेत. पूर्वज भूमिहीन असल्याने आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करताना या कुटुंबांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत होते. ही अडचण ओळखून आमदार सुनील अण्णा शेळके जनसंपर्क कार्यालयातील रुपेश सोनुने आणि मोरया प्रतिष्ठानने विशेष पाठपुरावा केला.
"ठाकर समाजातील कुटुंबांचा मानसिक ताण कमी करून त्यांना शासकीय प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज १३ कुटुंबांचा प्रश्न मार्गी लागल्याने मनाला मोठे समाधान मिळाले आहे. उर्वरित कुटुंबांसाठीही शासन स्तरावर आमचा पाठपुरावा सुरूच राहील."
— सौ. अबोलीताई मयूर ढोरे (नगराध्यक्षा, वडगाव मावळ)
शासकीय योजनांचा मार्ग मोकळा
जातीचे दाखले मिळाल्यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यावेळी लाभार्थ्यांनी आमदार सुनील अण्णा शेळके आणि मयूरदादा ढोरे यांचे विशेष आभार मानले.
भविष्यातील संकल्प
येणाऱ्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, महिला बचत गटांची स्थापना आणि समाजकल्याण विभागाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी वडगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
बातमीदार: अमोल जाधव (मुंबई ईस्ट वार्ताहर)

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या