वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: १.५४ कोटींचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त
सचिन हाडके
वर्धा (प्रतिनिधी):
वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने हिंगणघाट उपविभागात मोठी कारवाई करत अवैध सुगंधित तंबाखूची तस्करी करणारा कंटेनर पकडला आहे. या कारवाईत १ कोटी ५४ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी
स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख श्री. विनोद चौधरी यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, 'जी.जे. २७ टी.डी. ९९१६' या क्रमांकाच्या कंटेनरमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी होत आहे. या माहितीच्या आधारे, संविधान चौक, वडनेर (राष्ट्रीय महामार्ग ४४) येथे सापळा रचून नाकाबंदी करण्यात आली. संशयित कंटेनर थांबवून झडती घेतली असता हा मोठा साठा उघडकीस आला.
जप्त केलेला मुद्देमाल
कंटेनरमध्ये दर्शनी भागात इतर साहित्य भरले होते, मात्र त्याच्या मागे लपवून ठेवलेला विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखू पथकाला आढळला:
- ईगल सुगंधित तंबाखू: ५५,४४,००० रुपये (२६४० किलो)
- होला सुगंधित तंबाखू: ४२,४०,००० रुपये (३२०० किलो)
- मज्जा सुगंधित तंबाखू: २६,२९,६०० रुपये (४६४ किलो)
- अशोक लेलँड कंटेनर: ३०,००,००० रुपये
- एकूण मुद्देमाल: १,५४,१३,६००/- रुपये
आरोपींना अटक
या प्रकरणी खालील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे:
१. विनोदकुमार रामबहादुर यादव (वय ३४, रा. नारोल, जि. अहमदाबाद, गुजरात) - चालक
२. कमलेश छोटेलाल वणवासी (वय २६, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) - क्लिनर
कायदेशीर कारवाई
अन्न सुरक्षा अधिकारी श्री. पियुष मानवतकर यांना घटनास्थळी पाचारण करून रितसर पंचनामा करण्यात आला. आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन वडनेर येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा (क्र. ०५/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
तपास पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो.उप.नी. बालाजी लालपालवाले, विजयसिंग गोमलाडू आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या