Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

कामगारांच्या मागण्यांवरून गिमाटेक्समध्ये पेच; प्रजासत्ताक दिनी गेटसमोर कामगारांचा एल्गार

 



पुढील लढाई आता न्यायालयात लढणार; कामगार संघटनेचा ठाम निर्धार

हिंगणघाट (प्रतिनिधी): २८ जानेवारी

वणी येथील गिमाटेक्स युनिटमधील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवरून व्यवस्थापन आणि संघटना यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. व्यवस्थापनाने ठेवलेले जाचक प्रस्ताव फेटाळून लावत, वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेने प्रजासत्ताक दिनी कंपनीसमोर जाहीर सभा घेऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकले. व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आता हा लढा न्यायालयात नेण्याचा निर्णय कामगारांनी एकमताने घेतला आहे.

आंदोलनाचा घटनाक्रम आणि बैठकींचे अपयश

​वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेने २४ ऑगस्ट २०२४ रोजी गिमाटेक्स व्यवस्थापनाकडे मागणी पत्र सादर केले होते. गेल्या दीड वर्षात व्यवस्थापनासोबत १० ते १२ बैठका झाल्या, मात्र कोणताही ठोस तोडा निघाला नाही. परिणामी, २९ ऑक्टोबर २०२५ पासून कामगारांनी गेटवर शिफ्टनुसार तीन महिने सातत्याने निदर्शने केली.

​१९ डिसेंबर २०२५ रोजी आमदार समीरभाऊ कुणावार, संघटनेचे पदाधिकारी आणि कंपनीचे मालक प्रशांतजी मोहता यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक झाली. यावेळी आ. कुणावार यांनी कामगारांच्या हितासाठी खालील प्रस्ताव मांडले होते:

  • ​सर्व कामगारांना २००० रुपये पगारवाढ मिळावी.
  • ​सात महिन्यांचा थकीत 'अरिएस' (Arrears) द्यावा.
  • ​जुन्या व नवीन कराराची रक्कम २० दिवसांच्या कामावर आधारित असावी.
​१ नोव्हेंबर २०२४ पासून ४ वर्षांचा कार्यकाळ ग्राह्य धराव

व्यवस्थापनाचा 'यू-टर्न' आणि नवा पेच

​२१ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या पुनर्रचित बैठकीत व्यवस्थापनाने आ. कुणावार यांचा प्रस्ताव धुडकावून लावत अत्यंत जाचक अटी समोर ठेवल्या. मालक प्रशांत मोहता यांनी नवीन प्रस्तावात म्हटले की:

१. महिन्यात २० दिवस काम करणाऱ्यांनाच २००० रुपये वाढ मिळेल.

२. जुन्या कराराचे ४००० रुपये मिळण्यासाठी महिनाभर (२६ दिवस) उपस्थिती अनिवार्य असेल.

३. सात महिन्यांचा अरिएस न देता केवळ ५००० रुपयांपर्यंतच रक्कम दिली जाईल.

४. कराराची अंमलबजावणी जानेवारी २०२६ पासून होईल.

​हे प्रस्ताव कामगारांच्या हिताचे नसल्याचे सांगत संघटनेचे जनरल सेक्रेटरी पांडुरंग बालपांडे यांनी बैठकीच्या प्रोसिडिंगवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

गैरसमज पसरवल्याचा आरोप आणि जाहीर सभा

​व्यवस्थापनाने करार झाला असल्याचा खोटा दावा करत नोटीस बोर्डावर माहिती लावून कामगारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कामगारांनी कंपनी बंद ठेवली आणि गेटसमोर भव्य सभा घेतली. या सभेत कामगारांनी व्यवस्थापनाचा प्रस्ताव फेटाळून लावत कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला.

उपस्थित मान्यवर

​यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंदजी देशपांडे, जनरल सेक्रेटरी पांडुरंग बालपांडे, जयंत बावणे, दामोधर देशमुख, जीवन भानसे, प्रशांत शेळके, राकेश तराळे, हेमंत भगत, मनोज जुमडे, विनोद कावळे, श्रावण थुटे, विनोद कोल्हे, विजय थुल, राहुल देशमुख, लक्ष्मण जयपूरकर यांच्यासह हजारो कामगार उपस्थित होते.

"कामगारांच्या हक्कावर गदा आणणारे प्रस्ताव आम्हाला मान्य नाहीत. व्यवस्थापन संभ्रम पसरवत आहे, त्यामुळे आता आम्ही हा लढा न्यायालयात नेऊनच न्याय मिळवू."

पांडुरंग बालपांडे (जनरल सेक्रेटरी, वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटना)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या