तंबाखूमुक्तीची शपथ आणि महापुरुषांच्या पुस्तकांचे वाटप: ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
पिंपळगाव (मा.): प्रतीक झाडे
येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे गावाला शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचा संदेश देत, इयत्ता १० वी मध्ये ८५% गुण मिळवून गावात प्रथम आलेल्या वैदू सचिन झाडे या गुणवंत विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महापुरुषांना अभिवादन आणि वैचारिक प्रबोधन
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वैराग्यमूर्ती संत गादगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी राष्ट्रीय समाज प्रबोधनकार प्रतिक महाराज झाडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विषद केले.
"१५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला तरी २६ जानेवारी १९५० पर्यंत आपण 'डोमिनियन' होतो. २ वर्षे ११ महिने १८ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार स्तंभांवर आपले प्रजासत्ताक टिकून आहे," असे विचार त्यांनी मांडले. १९३० च्या लाहोर अधिवेशनातील पूर्ण स्वराज्याच्या संकल्पाची आठवण करून देत त्यांनी संविधानातील मूल्यांची ओळख करून दिली.
विविध उपक्रमांचे आयोजन
याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांची पुस्तके भेट देण्यात आली. तसेच, संपूर्ण गावाला तंबाखू मुक्त करण्याची सामूहिक शपथ यावेळी घेण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बँड पथकाच्या तालावर काढण्यात आलेल्या प्रभातफेरीने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रफुलजी ईखार, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका, सेविका तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक परिचालक श्री. प्रफुल राऊत, कर्मचारी श्री. आकाश लिहितकर, श्री. विशाल घ्यारे, रोजगार सेवक श्री. ओमप्रकाश कुमरे, श्री. हरिभाऊ चौगुले व सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या