सचिन हाडके (जिल्हा प्रतिनिधी)
हिंगणघाट: नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करत, वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन देण्यात आले.
२६ जानेवारी रोजी नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख टाळला. या प्रकारावर त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या वनविभागाच्या महिला कर्मचारी श्रीमती माधवी जाधव यांनी तात्काळ आक्षेप नोंदवला होता.
वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा उमेदवार अश्विन श्रावण तावाडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
- गुन्हा दाखल करा: मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (SC/ST Act) गुन्हा दाखल करावा.
- निष्पक्ष चौकशी: या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
- माधवी जाधव यांना संरक्षण: ज्या महिला कर्मचाऱ्याने धैर्याने आवाज उठवला, त्यांचे कोणत्याही प्रकारे शासकीय छळवणूक, बदली किंवा निलंबन होऊ नये, याची लेखी हमी द्यावी.
- पोलिसांवर कारवाई: गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित पोलीस यंत्रणेवरही कारवाई करण्यात यावी.
आंदोलनाचा इशारा
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जाणीवपूर्वक टाळणे हा केवळ निष्काळजीपणा नसून संविधानाचा आणि संपूर्ण बहुजन समाजाचा अपमान आहे," अशी भावना अश्विन तावाडे यांनी व्यक्त केली. जर या प्रकरणी तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनाच्या प्रती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या