हिंगणघाट: नरेंद्र (विवेक) चिंतलवार
देशसेवेचे ध्येय उराशी बाळगून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात (CISF) रुजू होण्यासाठी सज्ज झालेली हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वार्डची सुकन्या कु. श्रावणी अनिलराव गुरनुले हिचा 'पॅरामिलिटरी मित्र परिवार' आणि 'माजी पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट (तह)' च्या वतीने नुकताच भावपूर्ण सत्कार करण्यात आला. श्रावणी आगामी ६ जून रोजी देशसेवेच्या या नव्या प्रवासासाठी रवाना होत आहे.
या सोहळ्यात श्रीमती शालिनीताई चांभारे यांच्या हस्ते कु. श्रावणी गुरनुले हिला शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले व तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मान्यवरांनी वाढवला आत्मविश्वास
या प्रसंगी प्रभाग क्र. ०४ चे नगरसेवक सूरज कुबडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोणकर आणि माजी पॅरामिलिटरी मित्र परिवार ग्रुपचे अध्यक्ष विवेक भगत सर यांनी श्रावणीला मोलाचे मार्गदर्शन करत तिचा आत्मविश्वास वाढवला. श्रावणीचे हे यश संपूर्ण हिंगणघाट शहरासाठी आणि विशेषतः संत ज्ञानेश्वर वार्डसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
"श्रावणीची ही कामगिरी परिसरातील इतर तरुणींनाही देशसेवेच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोठी प्रेरणा देईल."
कार्यक्रमाला उपस्थिती
या शानदार सत्कार समारंभाचे आयोजन ग्रुपचे संस्थापक दिनेश नरड यांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट (तह) ग्रुपचे अध्यक्ष अमोल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या सोहळ्याला रवींद्र नोकरकर, प्रभाकर पाटील, शेख अख्तर, जानरावजी चांभारे, पुरुषोत्तम उईके, राजू साटोने, अशोक खोडे यांच्यासह ग्रुपचे सर्व माजी सैनिक आणि संत ज्ञानेश्वर वार्डमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच श्रावणीवर कौतुकाचा वर्षाव करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या