पिंपळगाव (मा.) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पाहणी; विविध उपक्रमांचे कौतुक
प्रतीक झाडे
जिल्हा प्रतिनिधी
पिंपळगाव (मा.): मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत पिंपळगाव (मा.) येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पराग सोहम यांनी भेट देऊन गावातील विकासकामांची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. भोसले आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोहड उपस्थित होते.
भजन आणि दिंडीने भव्य स्वागत
गावात आगमन होताच ग्रामस्थांनी भजन आणि दिंडीच्या गजरात अधिकाऱ्यांचे उत्साही स्वागत केले. यावेळी अधिकाऱ्यांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र आणि जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. विशेषतः ग्रामपंचायतीजवळ विकसित करण्यात आलेल्या 'पळसबाग' या उपक्रमाची त्यांनी दखल घेतली.
महत्त्वाचे लोकार्पण व नाविन्यपूर्ण उपक्रम
- घरकुल लोकार्पण: प्रधानमंत्री आवास योजना (२०२५) अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच 'घर तिथे डिजिटल' या उपक्रमाची माहिती देण्यात आली.
- प्लास्टिक मुक्ती: जुन्या वस्त्रांपासून पिशव्या तयार करून गाव प्लास्टिक मुक्त करण्याचा संदेश देण्यात आला.
- पुस्तकांचे वाटप: मकरसंक्रांतीचे औचित्य साधून 'तिळगुळ घ्या आणि पुस्तक घ्या' हा उपक्रम राबवून महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले.
- बचत गट स्टॉल: महिला बचत गटांमार्फत बकरीच्या दुधापासून साबण, गांडूळ खत, सेंद्रिय भाजीपाला आणि हळद अशा विविध लघुउद्योगांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
शासकीय योजनांचा लाभ
कार्यक्रमात दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे धनादेश १९ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. तसेच मागासवर्गीय निधीतून पूर्ण झालेल्या बंदिस्त नाली कामाची आणि अद्ययावत रेकॉर्ड रूमची पाहणी करण्यात आली.
'बक्षीस पात्र होण्यासाठी सज्ज व्हा' – सीईओ पराग सोहम
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. पराग सोहम यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले. "मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात या गावाने जोमाने काम करून बक्षीस पात्र व्हावे," असे आवाहन त्यांनी केले.
उपस्थित मान्यवर:
या सोहळ्याला गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे, विस्तार अधिकारी चौधरी व चांभारे, आरोग्य अधिकारी डॉ. नाईक, प्रशासक मिनेश जाधव, ग्रामपंचायत अधिकारी प्रफुल ईखार, माजी सरपंच पुरुषोत्तम वरटकर, प्रतीक महाराज झाडे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भजनी मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिनेश जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रफुल ईखार यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या