Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेसाठी आमदार समीर कुणावार यांचा 'मंत्रालयात' धडाका; शेकापूर (बाई), कांढळी व सिंदी (रेल्वे) च्या प्रस्तावांना मिळणार गती

 



हिंगणघाट/समुद्रपूर: नरेंद्र (विवेक) चिंतलवार

ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच मिळावी, यासाठी आमदार समीर कुणावार यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) व समुद्रपूर तालुक्यातील कांढळी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्याबाबत आमदार कुणावार यांच्या पुढाकाराने मंत्रालयात आरोग्य मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

आरोग्य मंत्र्यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक

दिनांक ११ मार्च रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीत केवळ चर्चाच झाली नाही, तर प्रलंबित प्रस्तावांना तांत्रिक मान्यता देऊन ते अंतिम टप्प्यात नेण्यावर भर देण्यात आला. बैठकीला आरोग्य विभागाचे मुंबईतील संचालक, उपसचिव, सहसंचालक, नागपूर परिमंडळाचे उपसंचालक, वर्ध्याचे जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

शेकापूर आणि कांढळीसाठी सकारात्मक पाऊल

शेकापूर (बाई) आणि कांढळी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता. या प्रस्तावातील त्रुटी दूर करून त्याला अंतिम मंजुरी मिळवून देण्यासाठी आमदार कुणावार यांनी बैठकीत आग्रही भूमिका मांडली. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावाला गती देण्याचे निर्देश दिले.

सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न होणार साकार

सिंदी (रेल्वे) हे परिसरातील मोठे केंद्र असून येथे ग्रामीण रुग्णालय होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रस्तावावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या रुग्णालयामुळे परिसरातील डझनावारी गावातील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरात धाव घ्यावी लागणार नाही. या संदर्भात आवश्यक ती पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

"ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधांसाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते, हे चित्र बदलायचे आहे. शेकापूर, कांढळी आणि सिंदी (रेल्वे) येथील आरोग्य केंद्रे कार्यान्वित झाल्यास सामान्यांना वेळेवर उपचार मिळतील. या कामात कोणतीही कसर सोडणार नाही."

समीर कुणावार, आमदार, हिंगणघाट-समुद्रपूर विधानसभा क्षेत्र.


​आमदार समीर कुणावार यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील आरोग्य सेवेचा चेहरामोहरा बदलणार असून, ग्रामीण जनतेतून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या