मुंबई | प्रतिनिधी - अमोल जाधव
कोकणवासीयांसाठी महत्त्वाची असलेली आणि गेल्या काही काळापासून बंद ठेवण्यात आलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर (गाडी क्र. ५०१०३/४) पुन्हा पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले. मुंबईकर आणि कोकणवासियांच्या हक्काची ही गाडी बंद करून त्याजागी परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याबद्दल मनसेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आज मनसेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी रेल्वे प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत दादर-रत्नागिरी ट्रेन तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
'कोकणवासीयांवर अन्याय नको'
निवेदनात नमूद केल्यानुसार, कोविड काळापासून मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, मुंबई-मनमाड गोदावरी एक्सप्रेस आणि पंढरपूर एक्सप्रेस यांसारख्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत, मात्र त्याच वेळापत्रकात आता परराज्यात जाणाऱ्या गाड्या सोडल्या जात आहेत. विशेषतः दादर-रत्नागिरी गाडी रद्द करून त्याजागी दादर-गोरखपूर गाडी सुरू करण्यात आल्याने कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाचा हा दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही, असे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले.
आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र, जर रेल्वेने याकडे दुर्लक्ष केले तर स्थानिक जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होईल आणि मनसेला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा गर्भित इशाराही शिष्टमंडळाने दिला आहे.
याप्रसंगी रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी मनसे नेते श्री. शिरीष सावंत, संदीप देशपांडे, मनसे रेल्वे कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाचे मुद्दे:
- दादर-रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करण्याची आग्रही मागणी.
- परराज्यातील गाड्यांना प्राधान्य देऊन स्थानिक प्रवाशांना डावलल्याचा आरोप.
- मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या