क्रीडा व वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन
वडगाव मावळ (प्रतिनिधी, अमोल जाधव) :
"सशक्त महिला हाच निरोगी समाजाचा पाया आहे. महिलांचे आरोग्य उत्तम राहिल्यास संपूर्ण कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचे आरोग्य सुदृढ राहते," असे प्रतिपादन नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडगाव नगरपंचायत आणि विघ्नहर्ता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात त्या बोलत होत्या.
आरोग्य शिबिराचा २०० हून अधिक महिलांना लाभ
सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी नगरपंचायत कार्यालयात हे शिबीर पार पडले. महिला व बाल कल्याण समितीच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात ईसीजी, हिमोग्लोबिन, किडनी, लिव्हर तपासणी, शुगर, कोलेस्ट्रॉल, डोळे व कान-नाक-घसा अशा विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या.
- विशेष सुविधा: शिबिरात आलेल्या महिलांना कॅल्शियम आणि आयर्न फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
- शासकीय योजना: ५० महिलांना 'आयुष्यमान भारत' कार्डचे तात्काळ वाटप करण्यात आले.
कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सन्मान
आरोग्य शिबिरासोबतच विविध क्षेत्रात वडगावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये:
- क्रीडा क्षेत्र: आंतरराष्ट्रीय खेळाडू हर्षदा गरुड, हर्षदा दुबे आणि रुचिका ढोरे.
- वैद्यकीय क्षेत्र: डॉ. शुभांगी बहिरट आणि डॉ. स्मिता पालवे. यासोबतच शहरातील आशासेविका, महिला सफाई कर्मचारी आणि नगरपंचायतीच्या महिला अधिकाऱ्यांचाही सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
"वडगावात खऱ्या अर्थाने महिलाराज"
सध्या वडगाव नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षा, महिला व बाल कल्याण सभापती, आरोग्य सभापती आणि विरोधी पक्षनेते ही सर्व महत्त्वाची पदे महिलाच भूषवित आहेत. महिलांच्या या सक्षम प्रतिनिधित्वाचे सर्वांनी कौतुक केले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या