Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

यवतमाळ येथील नगरपरिषद घंटागाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार; 'स्वतंत्र मुन्सिपल कंत्राटी कामगार युनियन'च्या शहर कार्यकारिणीची निवड

 



यवतमाळ (प्रतिनिधी):

शोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि कामगारांचे हक्क मिळवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने संघटित होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा. सुनील तेलतुंबडे यांनी केले. स्थानिक विश्रामगृह येथे १५ मार्च रोजी आयोजित नगरपरिषद घंटागाडी व लेबर कर्मचाऱ्यांच्या सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

​या सभेला स्वतंत्र मजदूर युनियनचे सरचिटणीस मा. गणेश उके यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी व्यासपीठावर यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा. अरविंद दिवे, सल्लागार मा. नामदेवराव थुल, तसेच हिंगणघाट शाखेचे अध्यक्ष विकी सहारे, सरचिटणीस सचिन हाडके, कोषाध्यक्ष सचिन कांबळे आणि संघटक मयूर जांभुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशासन आणि कंत्राटदारांच्या शोषणावर प्रहार

​सभेत उपस्थित घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. यावेळी गणेश उके यांनी मार्गदर्शन करताना प्रशासन आणि कंत्राटदार संगनमताने कर्मचाऱ्यांचे कसे शोषण करतात, यावर प्रकाश टाकला. हिंगणघाट शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटना स्थापन झाल्यामुळे तेथील कामगारांना मिळालेले फायदे आणि बदललेली परिस्थिती याबाबत आपले अनुभव मांडले.

कायदे आणि विचारधारेची मांडणी

​अध्यक्षीय भाषणात सुनील तेलतुंबडे यांनी सोसायटी ॲक्ट १८६० आणि ट्रेड युनियन ॲक्ट १९२६ मधील तांत्रिक फरक समजावून सांगितला. ते म्हणाले की, "संविधानाने कामगारांना मोठे अधिकार दिले असतानाही भांडवलशाही मानसिकतेमुळे कामगारांचे शोषण होत आहे. ही संघटना फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारी असून, मनुवादी व भांडवलशाही वृत्तीच्या विरोधात आमचा लढा कायम राहील."



यवतमाळ शहर कार्यकारिणीची घोषणा

​या सभेत सर्वानुमते 'स्वतंत्र मुन्सिपल कंत्राटी कामगार युनियन, शाखा-यवतमाळ' शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

​कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. जीवन प्रकाश मुनेश्वर यांनी केले. या सभेला घंटागाडी कामगार व हेल्पर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या या नव्या विस्तारामुळे यवतमाळमधील कंत्राटी कामगारांच्या लढ्याला आता मोठी ताकद मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या