Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

वर्ध्यात हायप्रोफाईल दुचाकी चोर अटकेत; शहर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी

 




जिल्हा प्रतिनिधी : सचिन हाडके

वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने (DB Squad) अत्यंत शिताफीने तपास करत एका सराईत दुचाकी चोराला अटक केली आहे. या कारवाईमुळे मागील काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, ४५ हजार रुपये किमतीची सुझुकी बर्गमॅन मोपेड जप्त करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

​दिनांक १२ मार्च २०२६ रोजी, गोपूरी चौक परिसरातील रहिवासी सुरेंद्र रामचंद्र महाकाळकर यांनी आपली सुझुकी बर्गमॅन मोपेड (क्रमांक MH 32 AQ 9970) घरासमोर उभी केली होती. काही वेळानंतर ते कामानिमित्त बाहेर गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोरून ही मोपेड लंपास केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि फिर्यादीच्या तक्रारीवरून वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. २९९/२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.) दाखल करण्यात आला होता.

असा लागला चोराचा सुगावा

​या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाला खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाली की, एक तरुण विना क्रमांकाची राखाडी रंगाची बर्गमॅन मोपेड घेऊन 'विसावा चौक, इतवारा' परिसरात फिरत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीची ओळख आणि कबुली

​अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनुराग प्रवीण धाबर्डे (वय २० वर्ष, रा. तळोदी-कुटकी, ता. सेलू, जि. वर्धा) असे आहे. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने १२ मार्च रोजी गोपूरी चौक येथून सदर मोपेड चोरल्याची कबुली दिली. स्वतःची ओळख पटू नये म्हणून त्याने गाडीची नंबर प्लेट काढून टाकली होती.

यांनी केली कारवाई

​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर आणि वर्धा शहर ठाणेदार श्री. भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर, पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, हवालदार महेंद्र पाटील, अभिजित वाघमारे, पोलीस अंमलदार रंजित भुरसे आणि अमोल साळवण यांचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या