हिंगणघाट (प्रतिनिधी): सचिन हाडके
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे अंमली पदार्थ विरोधी कृती दल, नागपूर आणि स्थानिक डी.बी. पथकाने संयुक्तरीत्या मोठी कारवाई केली आहे. चौका शाळा मैदानावर सापळा रचून केलेल्या या कारवाईत समीर खुशालराव गायकवाड (३०, रा. नन्नाशा वार्ड, हिंगणघाट) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून मॅफेड्रान (MD) नावाचा अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी दुपारी २:०० वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी कृती दल नागपूरचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सादीक शेख हे हिंगणघाट परिसरात गस्तीवर होते. यादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, हिंगणघाट पोलीस पथकाच्या मदतीने चौका शाळा ग्राउंड परिसरात छापा टाकण्यात आला.
जप्त केलेला मुद्देमाल:
संशयित आरोपी समीर गायकवाड याची अंगझडती व वाहनाची तपासणी केली असता खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला:
- मॅफेड्रान (MD): ५.७८ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ (किंमत १५,९३० रुपये).
- वाहन: टीव्हीएस ज्युपीटर मोपेड (क्र. MH-32-AQ-9414) (किंमत ८०,००० रुपये).
- मोबाईल: विवो V40e कंपनीचा मोबाईल (किंमत १५,००० रुपये).
- एकूण किंमत: १,१०,९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
गुन्हा दाखल आणि कारवाई:
याप्रकरणी आरोपीविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) कलम ८(क), २१(ब) अन्वये गुन्हा (अ.क्र. ०३८३/२०२६) नोंदवण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, आणि पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात सपोनि पद्माकर मुंडे, श्रेणी पोउपनि सादीक शेख, प्रदीप डोंगरे, अभिजित गावंडे (नागपूर पथक) तसेच हिंगणघाट डी.बी. पथकाचे प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे आणि रोहित साठे यांचा समावेश होता.
घटनेचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या