अमृत योजनेच्या नियोजनशून्य व निकृष्ट कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आग्रही मागणी
मुख्य संपादक (२२ जून २०२६): सचिन हाडके हिंगणघाट : नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये प्रभाग क्र. ४ मधील दूषित पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न लोकप्रतिनिधी नगरसेवक सूरज कुबडे यांनी सभागृहात अत्यंत ठामपणे मांडला. अमृत योजनेच्या नावाखाली सुरू असलेल्या ढिसाळ आणि निकृष्ट कामांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
अमृत योजनेअंतर्गत शहरात करण्यात आलेल्या कामांमध्ये प्रचंड नियोजनशून्यता, निकृष्ट दर्जा आणि बेजबाबदारपणा दिसून येत आहे. याचा थेट फटका प्रभाग क्र. ४ मधील नागरिकांना बसत असून, त्यांना गेल्या काही दिवसांपासून दूषित व आरोग्यास घातक असलेल्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या अत्यंत संवेदनशील व गंभीर विषयाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची चपराक नगरसेवक सूरज कुबडे यांनी प्रशासनाला लगावली.
नागरिकांमध्ये तीव्र संताप:
वारंवार तक्रारी, निवेदने आणि सतत पाठपुरावा करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने प्रभागातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या दूषित पाण्यामुळे अनेक कुटुंबांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून लहान मुले व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे, याकडे कुबडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
या समस्येची गंभीर दखल घेत, अमृत योजनेतील या अनागोंदी कारभारासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि संपूर्ण यंत्रणेची सखोल व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी नगरसेवक सूरज कुबडे यांनी सभागृहात ठामपणे लावून धरली.
प्रशासनाने कुठलाही वेळ न गमावता प्रभाग क्र. ४ मधील नागरिकांना तात्काळ शुद्ध, स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, असे निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली. जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणाऱ्या या प्रवृत्तीविरोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
"जनतेच्या हक्कासाठी आणि त्यांच्या प्रत्येक समस्येसाठी मी सदैव संघर्ष करत राहणार!"
— सूरज कुबडे (नगरसेवक, प्रभाग क्र. ४)

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या