आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश; एकूण १५ बसेस मंजूर
हिंगणघाट (विशेष प्रतिनिधी): आशिष अंबादे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगणघाट आगारात नागरिकांच्या सेवेसाठी नव्याने उपलब्ध झालेल्या पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचा लोकार्पण सोहळा आज बस स्थानक परिसर, हिंगणघाट येथे उत्साहात पार पडला. हिंगणघाट शहराच्या नगराध्यक्षा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या नवीन बसेसचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या बससेवेमुळे हिंगणघाट शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
राज्याचे परिवहन मंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने तसेच हिंगणघाट विधानसभेचे आमदार मा. श्री. समीरभाऊ कुणावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हिंगणघाट आगारासाठी एकूण १५ नवीन बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसेस आज प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातील महत्त्वाच्या कामकाजामुळे व तालिकाध्यक्ष म्हणून असलेल्या जबाबदारीमुळे आमदार समीरभाऊ कुणावार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांनी या उपक्रमासाठी डिजिटल माध्यमांतून शुभेच्छा संदेश पाठवला व नागरिकांना उत्तम सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.
"संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारी ‘लालपरी’ ही सर्वसामान्य नागरिकांची, विद्यार्थ्यांची, महिलांची व शेतकऱ्यांची विश्वासार्ह जीवनवाहिनी आहे. या नवीन बसेसमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी होईल. नागरिकांनी सार्वजनिक मालमत्तेचे जतन करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे."
— नगराध्यक्षा, हिंगणघाट
कर्तव्यदक्ष चालक-वाहकांचा गौरव
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून हिंगणघाट आगाराला उत्कृष्ट उत्पन्न मिळवून देण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वाहन चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रामाणिक सेवाभावाचा व उत्कृष्ट कार्याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सार्वजनिक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे समर्पण हेच परिवहन व्यवस्थेच्या यशाचे खरे गमक असल्याचे यावेळी बोलताना सांगण्यात आले.
या सोहळ्याला स्थानिक माननीय नगरसेवक, नगरसेविका, एसटी महामंडळाचे विभागीय अधिकारी, आगार व्यवस्थापक, चालक, वाहक, प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. नवीन बसेस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या