हिंगणघाट(विशेष प्रतिनिधी) आशिष अंबादे
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि वीज ग्राहकांवर लादण्यात आलेली स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना एक जाहीर निवेदन देण्यात आले. यावेळी संतप्त नागरिकांनी स्मार्ट मीटरचे बॉक्स फोडून या सक्तीचा तीव्र निषेध नोंदवला. महावितरणने १५ दिवसांत ही सक्ती मागे न घेतल्यास नागरिकांचा तीव्र आक्रमक मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
नागरिकांमध्ये तीव्र असंतोष
सध्या वाढते वीजदर आणि महावितरणचे अनियमित बिलिंग यामुळे हिंगणघाट परिसरातील जनता आधीच त्रस्त आहे. त्यातच आता शासनाने व महावितरणने ग्राहकांवर 'स्मार्ट मीटर'ची सक्ती सुरू केल्याने नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. या सक्तीमुळे सर्वसामान्य नागरिक, कामगार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, आज त्याचा उद्रेक पाहायला मिळाला.
"सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार न करता महावितरण हुकूमशाही पद्धतीने स्मार्ट मीटर लादत आहे. आधीच महागाईने होरपळलेल्या जनतेवर हा आर्थिक भार कशासाठी? महावितरणने १५ दिवसांत ही सक्ती रद्द केली नाही, तर हिंगणघाट येथील कार्यालयावर जनतेचा विराट आणि आक्रमक मोर्चा धडकेल."
— अतुल वांदिले (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस - शपा)
मुख्य मागण्या आणि आंदोलनाचा पवित्रा
- स्मार्ट मीटरची सक्ती पूर्णपणे रद्द करण्यात यावी.
- अनियमित आणि भरमसाठ येणारी वीज बिलिंग दुरुस्त करण्यात यावी.
- सर्वसामान्य ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना वीजदरात दिलासा देण्यात यावा.
यावेळी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील शेकडो नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. आता महावितरण या १५ दिवसांच्या अल्टीमेटमवर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या