(मुख्य संपादक): सचिन हाडके
केवळ प्रशासनाच्या भरवशावर न राहता जर प्रबळ इच्छाशक्ती, लोकप्रतिनिधींची तत्परता आणि जनतेचा सहभाग एकत्र आला, तर वर्षानुवर्षांचे कठीण प्रश्नही सहज सुटू शकतात, याचा एक उत्तम आदर्श हिंगणघाट शहरात पाहायला मिळाला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील नेहरू वॉर्डातील अनधिकृत कचरा डेपो नगरसेवक दिनेश वर्मा यांच्या पुढाकाराने आणि लोकसहभागातून अखेर कायमचा हटवण्यात आला आहे.
मध्यवर्ती भागाला लागलेले ग्रहण सुटले
गांधी, नेहरू, जैन मंदिर आणि जगन्नाथ वॉर्ड मिळून बनलेला प्रभाग क्रमांक १३ हा हिंगणघाट शहराचा मुख्य मध्यवर्ती भाग आहे. येथे न्यायालय, बँका, रुग्णालये, शासकीय कार्यालये आणि मोठी निवासी-व्यापारी वस्ती असल्यामुळे दिवसभर नागरिकांची प्रचंड वर्दळ असते.
परंतु, याच प्रभागातील नेहरू वॉर्डात असलेल्या गोकुळधाम मैदानाच्या बाजूला आणि सुतीका गृह रुग्णालयाजवळील मोकळ्या जागेला गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत कचरा डेपोचे स्वरूप आले होते. सुरुवातीला स्थानिक आणि नंतर संपूर्ण शहरातील कचरा येथे आणून टाकला जात होता. परिणामी, स्टेट बँकेपासून सुतीका गृह ते गोकुळधाम मैदान या संपूर्ण मार्गावर दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करणेही कठीण झाले होते.
प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांची नगरसेवकांकडे धाव
या त्रासाला कंटाळून स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या, विनंत्या केल्या; मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. अखेर वैतागलेल्या नागरिकांनी आपल्या प्रभागाचे नगरसेवक दिनेश वर्मा यांच्याकडे धाव घेतली.
लोकसहभाग आणि 'सराफा' व्यावसायिकाची मोठी मदत
प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून नगरसेवक दिनेश वर्मा यांनी वेळ न दवडता नागरिकांशी चर्चा केली आणि 'लोकसहभागातून' हा प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला. त्यांच्या या संकल्पनेला प्रभागातून मोठा पाठिंबा मिळाला. यात येथील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक श्री. सुभाष निनावे यांनी सामाजिक बांधिलकी जपत तात्काळ आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी स्वखर्चातून जवळपास ५० हजार रुपये किमतीची तारांची जाळी, लोखंडी अँगल्स आणि टिन पत्रे उपलब्ध करून दिली.
परिसर झाला कचरामुक्त!
मिळालेल्या साहित्यातून आणि लोकवर्गणीतून संपूर्ण मोकळ्या जागेला टिनपत्रे व तारांच्या जाळीचे मजबूत कुंपण घालून बंदिस्त करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी कचरा टाकणे पूर्णपणे बंद झाले असून, वर्षानुवर्षे घाणीच्या विळख्यात असलेला हा परिसर आता स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला आहे.
"केवळ आश्वासने न देता नागरिकांच्या समस्या स्वतःच्या मानून त्यावर प्रत्यक्ष कृती करणारे लोकप्रतिनिधीच जनतेला हवे असतात. दिनेश वर्मा आणि प्रभाग १३ मधील नागरिकांनी मिळून संपूर्ण शहरासमोर एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे."
— स्थानिक नागरिक, हिंगणघाट.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या