Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

हिंगणघाटच्या अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला गती

 



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद; संबंधित विभागाला तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

हिंगणघाट (विशेष प्रतिनिधी): आशिष अंबादे 

हिंगणघाट शहराचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आणि शहराला 'स्वच्छ, सुंदर व आदर्श' बनवण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे. हिंगणघाट शहरामध्ये अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीसह 'स्वच्छ भारत मिशन (नागरी)' अंतर्गत विशेष निधी उपलब्ध करून देण्यासाठी हिंगणघाटच्या नगराध्यक्षांनी स्थानिक आमदार श्री. समीरभाऊ कुणावार यांच्या समवेत मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर केला.

​या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे आणि त्वरित पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

नांदगाव येथील नागरिकांचा विरोध व पर्यायी जागा

​हिंगणघाट शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता दररोज सुमारे २० ते २२ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. नगरपरिषदेकडे सध्या उपलब्ध असलेली ४.५० एकर जागा अपुरी पडत होती, तसेच नांदगाव येथील स्थानिक नागरिकांचाही या जागेला विरोध होता. यावर मार्ग काढत नगरपरिषदेने प्रकल्पासाठी नवीन पर्यायी जागेची निश्चिती केली आहे. या नवीन जागेवर शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणारा आधुनिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:

​सादर करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये (DPR) खालील महत्त्वाच्या सुविधांचा समावेश आहे:

  • शास्त्रोक्त प्रक्रिया केंद्र: कचऱ्याचे वर्गीकरण व ओल्या कचऱ्यापासून उच्च दर्जाच्या सेंद्रिय खताची निर्मिती.
  • प्लास्टिक पुनर्प्रक्रिया: प्लास्टिक कचऱ्याचे संकलन आणि पुनर्प्रक्रिया यंत्रणा.
  • वैज्ञानिक लँडफिल व यांत्रिकीकरण: पर्यावरणाला हानी न पोहोचवणारी 'साइंटिफिक लँडफिल' आणि कचरा संकलनासाठी अत्याधुनिक वाहने.
  • सार्वजनिक स्वच्छता: स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शहरात सार्वजनिक व सुलभ शौचालयांची उभारणी.
  • मुख्यमंत्री कार्यालयात होणार सादरीकरण (Presentation)

    या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रकल्पाबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका दर्शवली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून निमंत्रण प्राप्त झाल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण (Presentation) थेट मुख्यमंत्र्यांसमोर करण्याची संधीही मिळणार आहे.


    'सुंदर व पर्यावरणपूरक हिंगणघाट'साठी प्रयत्न कटिबद्ध!

    "आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हिंगणघाट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत. हिंगणघाटला पर्यावरणपूरक आणि स्वच्छ शहर बनवण्यासाठी आवश्यक तो सर्व निधी आणि मंजुरी मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न भविष्यातही अविरत सुरू राहतील."

    नगराध्यक्षा, हिंगणघाट नगरपरिषद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या