विशेष प्रतिनिधी / वर्धा: अर्पित वाहने
वर्धा शहरात आज एका अनोख्या आंदोलनाने खळबळ उडवून दिली आहे. "कॅफे गुडलक" परिसरात झालेल्या या आंदोलनादरम्यान तरुणांनी पोलिसांच्या नाकी दम आणल्याचे पाहायला मिळाले. प्रशासनाकडून युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई केली जात असल्याच्या संतापातून हे आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक उसळलेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे आणि युद्धासारखे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षेसाठी १०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा आणि पोलिसांच्या तब्बल ६ गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या.
आंदोलनाची अनोखी शैली आणि पोलिसांची कसरत
या आंदोलनाची शैली अत्यंत मजेशीर आणि वेगळी असल्याचे दिसून आले. तरुणांनी आंदोलनाचे विकेंद्रीकरण करत पोलिसांना चांगलेच जेरीस आणले. एकीकडे पोलीस एका टोकाला धावत असताना, दुसरीकडे पोरं गल्ल्या-गल्ल्यांत जमून घोषणाबाजी करत होती. विशेष म्हणजे, आंदोलकस्वतःहून पोलिसांच्या गाडीत बसत असून, गाडीत बसताच "न नरेंद्र मोदी मुर्दाबाद" आणि "भारत माता की जय" अशा जोरदार घोषणा देत असल्याचे पाहायला मिळाले.
पोलिसांच्या गाड्या भरून आंदोलकांना भरदिवसा ताब्यात घेतले जात असतानाही तरुणांमधील उत्साह कमी झालेला नाही. काल अटक झालेले काही तरुण आज पुन्हा स्वेच्छेने पोलिसांच्या गाडीत बसत असल्याची चर्चा आहे. आंदोलकांच्या या खोडकर आणि स्मार्ट मुव्हमुळे पोलीस यंत्रणा अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि तरुणांचा हा बिनधास्तपणा पाहून स्थानिकांमध्ये एकच कुतूहल निर्माण झाले आहे. "आम्ही रोजच आंदोलन करणार, बघू कोणाची ऊर्जा टिकते," असा पवित्रा या तरुणांनी घेतला असून, हा लढा आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे वर्धा शहरात एकच चर्चा रंगली असून, या आंदोलनाची राज्यभरात मोठी चर्चा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या