आगरगाव (देवळी): अर्पित वाहणे
"श्रद्धेशिवाय माणूस राहू शकत नाही अशी भावनिक समज भारतीय समाजात आहे. परंतु, कोणावरही ठेवली जाणारी श्रद्धा ही डोळस असावी. डोळे बंद करून, विचार न करता आणि चिकित्सा न करता स्वीकारले तर भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकले जाण्याची शक्यता असते. माणूस हा विचार करणारा प्राणी असल्याने प्रत्येकाने श्रद्धा आणि विश्वास यांची काळजीपूर्वक चिकित्सा केली पाहिजे, हेच खरे माणूस असण्याचे लक्षण आहे," असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी केले.
देवळी जवळील आगरगाव येथील संत लहानुजी महाराज देवस्थानच्या सभागृहात ट्रस्टच्या वतीने गावातील तरुणींसाठी आयोजित तीन दिवसीय निवासी संस्कार शिबिरात ते मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी मंचावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, शिबीर प्रमुख भैयालालजी इंगळे, डॉ. माधुरी झाडे, डॉ. मंजुषा वरफडे, कविता राठोड व रजनी सुरकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन
दुसऱ्या सत्रात बोलताना राज्य प्रशिक्षण विभागाच्या सहकार्यवाह डॉ. माधुरी झाडे यांनी सांगितले की, "कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी भावनेच्या आहारी न जाता निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग आणि प्रचितीद्वारे तिची शहानिशा करावी. स्वतःमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करूनच आपण अंधश्रद्धा दूर करू शकतो."
चमत्कारांमागील विज्ञानाचा पर्दाफाश
या वेळी गजेंद्र सुरकार यांनी प्रात्यक्षिकांद्वारे विविध चमत्कारांचे सादरीकरण करून त्यामागील हातचलाखी आणि रासायनिक बदलांचे विज्ञान उलगडून दाखवले. "या जगात तंत्र-मंत्र, करणी, जादूटोणा, भुत किंवा भानामती या गोष्टींना कोणतेही अस्तित्व नाही. तसेच ग्रह-तारे, कुंडली, ज्योतिष, मंगळ किंवा रत्ने यांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा," असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंजुषा वरफडे यांनी केले, तर सूत्रसंचालन रजनी सुरकार यांनी केले. उपस्थितांचे आभार कविता राठोड यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या