सचिन हाडके
हिंगणघाट: (प्रतिनिधी)
पोलीस वर्धापन दिन आणि रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून आज, मंगळवार ६ जानेवारी रोजी हिंगणघाट येथे वाहन चालकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उप जिल्हा वाहतूक शाखा, हिंगणघाट यांच्या पुढाकाराने शहरातील विविध चौकांत चालकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले.
अमली पदार्थांचे दुष्परिणाम व रस्ता सुरक्षेवर मार्गदर्शन
आज सकाळी ९:४५ ते १०:३० या वेळेत हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ट्रॅव्हल्स पॉईंट, बस स्टॉप आणि नंदुरी चौक येथील ऑटो चालकांना एकत्र करून ही बैठक घेण्यात आली. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक (PSI) आवारे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक व सामाजिक दुष्परिणाम, वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यावर सविस्तर माहिती दिली. तसेच, अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत कशी करावी (Golden Hour), याबाबतही चालकांचे प्रबोधन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या जनजागृती कार्यक्रमात Gpsi मुसळे मॅडम, हवालदार भोयर साहेब, हवालदार वानखेडे साहेब, पोलीस शिपाई दातारकर साहेब, तसेच संजू त्रिपाठी साहेब, शिवाजी पाटील साहेब आणि उप जिल्हा वाहतूक शाखा हिंगणघाटचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
रस्ते सुरक्षा केवळ सप्ताहापुरती मर्यादित न ठेवता, ती जीवनशैली बनावी आणि चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमाचे शहरातील नागरिक व वाहन चालकांकडून स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या