जिल्हा प्रतिनिधी: सचिन हाडके
सेलू (वर्धा): एकाच नोंदणी क्रमांकाच्या दोन बनावट नंबर प्लेट तयार करून, त्या दोन वेगवेगळ्या ट्रकवर लावून शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सेलू पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन ट्रक आणि रेतीसह एकूण ७५ लाख २१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
सेलू येथील 'के.जी.एन. ट्रान्सपोर्ट' समोर दोन एकाच नंबरचे ट्रक उभे असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र ठाकूर यांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, तिथे उभे असलेल्या दोन्ही ट्रकवर 'MH 32 AS 2786' हा एकच क्रमांक आढळून आला.
तपास केला असता, यातील ट्रक मालक इरशादखां सिकंदरखां पठाण (वय ५०, रा. खडकी, ता. सेलू) आणि चालक अमित लिलाधर मस्के (रा. महाबळा, ता. सेलू) यांनी संगनमत करून हा प्रकार केल्याचे समोर आले.
अशी केली फसवणूक
आरोपींनी त्यांच्या मालकीच्या मूळ ट्रकच्या नंबरची बनावट प्लेट तयार केली आणि ती दुसऱ्या हुबेहूब दिसणाऱ्या ट्रकवर लावली. या क्लृप्तीचा वापर करून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील रंगमोचन घाटावरून कोणतीही रॉयल्टी न भरता (अवैधरीत्या) ४५६.६८ घनफूट पांढरी रेती चोरून आणली होती. एकाच नंबरचे दोन ट्रक वापरून ते शासनाचा महसूल बुडवत होते.
जप्त केलेला मुद्देमाल:
- दोन टाटा मोटर्स कंपनीचे ट्रक: किंमत अंदाजे ७५ लाख रुपये.
- अवैध पांढरी रेती: ४.५० ब्रास (किंमत २०,२५० रुपये).
- एकूण कारवाई: ७५,२१,२५० रुपये.
पोलीस कारवाई
ही कारवाई वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सागरकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू पोलीस ठाण्याचे पी.एस.आय. देवेंद्र ठाकूर, सफी निरंजन वरभे व त्यांच्या पथकाने केली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२) व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी.एस.आय. प्रितम निमगडे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या