हिंगणघाट नगर परिषद: कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे घंटागाडी कर्मचारी हवालदिल; ४ महिन्यांपासून वेतन थकीत
हिंगणघाट: एकीकडे 'स्वच्छ भारत' अभियानांतर्गत देशाला जागतिक स्तरावर नेण्याचे स्वप्न पाहिले जात असताना, हिंगणघाट नगर परिषदेत मात्र या अभियानाचा कणा असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कचरा संकलनाचे कंत्राट घेतलेल्या विश्वेश हायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मनमानी कारभारामुळे घंटागाडी चालक व कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे शहरात संताप व्यक्त होत असून, नवनिर्वाचित नगराध्यक्षा यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घंटागाड्यांची अवस्था 'भंगार'; तीन चाकांवर धावतात ट्रॅक्टर
नगर परिषदेने २०२१ मध्ये शहरातील घनकचरा संकलन आणि गाड्यांच्या देखभालीचे कंत्राट विश्वेश हायटेक कंपनीला दिले होते. मात्र, कंपनी केवळ स्वतःच्या फायद्याकडे लक्ष देत असून कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि गाड्यांच्या देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
- अनेक घंटागाड्यांचे पत्रे फाटलेले आहेत.
- काही ट्रॅक्टर चक्क तीन चाकांवर कचरा संकलनाचे काम करत असून अपघाताची टांगती तलवार कायम आहे.
- मेंटेनन्सअभावी निम्म्याहून अधिक गाड्या भंगार अवस्थेत पोहोचल्या आहेत.
निवडणुकीतील आश्वासने हवेत विरली?
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने प्रभागाची स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. आता सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. डॉ. नैना उमेश तुळसकर या जटील समस्येला कशा प्रकारे हाताळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ४ महिने वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी कर्ज काढावे लागत असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
कंत्राटदाराला पाठीशी घातले जात आहे का?
गाड्यांची दुरवस्था आणि कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन असतानाही नगर परिषद प्रशासन संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई का करत नाही? असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत. कंत्राटदाराच्या या भोंगळ कारभारामुळे पालिकेची प्रतिमा मलीन होत असून, अधिकारी याला खतपाणी तर घालत नाहीत ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
"आम्ही रात्रंदिवस शहर स्वच्छ ठेवतो, पण आमच्याच घरात अंधार आहे. ४ महिने झाले पगार नाही, मुलांच्या शाळा आणि घराचे रेशन भरायचे कसे? प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास काम बंद करण्याशिवाय पर्याय नाही."
— स्वतंत्र मुन्सिपल कंत्राटी कामगार युनियन हिंगणघाट


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या