इंग्रजांवरील ऐतिहासिक विजयाचा विजयोत्सव! वडगाव मावळात महादजी शिंदे विजय दिवस उत्साहात साजरा
वडगाव मावळ | प्रतिनिधी : अमोल जाधव
ऐतिहासिक वडगाव मावळच्या भूमीत १७७९ साली श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या अतुलनीय नेतृत्वाखाली मराठ्यांनी इंग्रजांना धूळ चारली होती. या देदिप्यमान विजयाला आज २४५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, वडगाव मावळ येथे ‘विजय दिवस’ मोठ्या उत्साहात आणि अभिमानात साजरा करण्यात आला.
स्मारकास अभिषेक आणि मानवंदना
विजयाच्या स्मृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र गिरिभ्रमण संस्था व गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्था, वडगाव यांच्या वतीने दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाची सुरुवात तळेगाव दाभाडे नगरीचे नगराध्यक्ष श्री. संतोषभाऊ दाभाडे पाटील यांच्या हस्ते महादजी शिंदे यांच्या स्मारकास अभिषेक करून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी ॲड. रवींद्रजी यादव, माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे आणि दोन्ही संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्यक्ष संतोषजी दाभाडे यांचा 'विजयगौरव सन्मानचिन्ह' देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
पुरस्कारांचे वितरण आणि व्याख्यान
विजय दिनाचे औचित्य साधून आज सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने:
- सरदार महादजी शिंदे क्रीडा पुरस्कार: राजस्थान येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवून मावळचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कु. रुचिका समीर ढोरे हिला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
- दुर्गवीर पुरस्कार: किल्ले संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘सफर किल्ल्यांची प्रतिष्ठान, मावळ’ या संस्थेला सन्मानित करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम
आज सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सचिन मधुराम ढोबळे यांचे “शिवशंभो चरित्र” या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानातून शिवरायांचा आणि शंभूराजांचा दैदिप्यमान इतिहास उलगडला जाणार आहे. तसेच, रात्री ८ वाजता वडगाव नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आणि मान्यवरांचा विशेष स्नेहमेळावा संपन्न होईल.
"१७७९ चा हा विजय केवळ मराठ्यांचा नव्हता, तर तो परकीय आक्रमकांविरुद्धचा स्वाभिमानाचा लढा होता. ही गौरवगाथा युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी हा सोहळा आयोजित केला जातो," असे आयोजकांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या