वर्ध्यात कर्कश आवाजाच्या १५० सायलेन्सरवर फिरविला 'रोलर'; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई
वर्धा (प्रतिनिधी):
रस्त्यावरून धावताना कानठळ्या बसवणारा आवाज आणि फटाके फोडणाऱ्या सायलेन्सरमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर, वर्धा शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम राबवून जप्त केलेले १५० अवैध आणि बनावट सायलेन्सर आज, ८ जानेवारी २०२६ रोजी बजाज चौकात रोलरखाली चिरडून नष्ट केले.
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त कारवाई
सध्या जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताह राबविला जात आहे. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. ज्या दुचाकींचे सायलेन्सर अनधिकृतपणे बदलण्यात आले होते आणि ज्यांचा आवाज ८० डेसिबलपेक्षा जास्त होता, अशा १५० सायलेन्सरवर मोटार वाहन कायदा कलम १९०(२), १९४(एफ) आणि १९८ अन्वये जप्तीची कारवाई करण्यात आली होती.
भरचौकात नष्ट केले सायलेन्सर
माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार, आज दुपारी १२:०० वाजताच्या सुमारास वर्ध्याच्या मुख्य बजाज चौकात पंचांच्या उपस्थितीत हे सर्व सायलेन्सर रस्त्यावर पसरवून त्यावर रोड रोलर फिरवण्यात आला. सायलेन्सरचा चक्काचूर करून ते कायमस्वरूपी निकामी करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात मोठ्या आवाजात गाड्या पळवणाऱ्या 'बुलेट राजां'चे धाबे दणाणले आहेत.
या पथकाने केली कामगिरी
ही कारवाई वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, एएसआय मंगेश येळणे, संजय भांडेकर, रियाज खान, दिलीप आंबटकर, प्रशांत करंजेकर, तसेच पोलीस हवालदार आशिष देशमुख, किशोर पाटील, मुकेश राऊत व प्रदीप कोहळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
"कोणत्याही वाहन चालकाने विनापरवाना सायलेन्सरमध्ये बदल करू नये. कर्कश आवाज किंवा फटाके फोडणारे सायलेन्सर वापरल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांना सोडले जाणार नाही."
— विलास पाटील (पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा वर्धा)

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या