Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

वर्धा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: बनावट दारू आणि सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ४.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

वर्धा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: बनावट दारू आणि सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ४.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त


सचिन हाडके 

वर्धा (प्रतिनिधी):

जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. समुद्रपूर तालुक्यातील उबदा येथे बनावट दारू, सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी सराईत गुन्हेगार अनिकेत कांबळे याच्यासह त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ४,५३,१०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

​पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि. ७ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समुद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे उबदा येथील सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ प्रकाश कांबळे याच्या घरावर छापा टाकण्यात आला.

बनावट दारू निर्मितीचे साहित्य जप्त

​छाप्यादरम्यान अनिकेत कांबळे याच्या घरात काम करणारा आरोपी भुवेश उर्फ ताडा उर्फ योगेश मनोहर जिल्हारे हा मिळून आला. पोलिसांनी अनिकेत कांबळे आणि त्याच्या घरासमोरील राहुल डोफे यांच्या घराची झडती घेतली असता, तिथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

जप्त करण्यात आलेले साहित्य:

  • देशी दारू: १,३०० सीलबंद शिपा (१३ खोके).
  • विदेशी दारू: ६५ सीलबंद शिपा.
  • बनावटीचे साहित्य: रॉयल स्टॅग कंपनीचे बनावट स्टिकर्स, रासायनिक द्रव्य, रिकाम्या बाटल्यांची झाकणे.
  • मशिनरी: सीलिंग आणि पॅकेजिंगसाठी लागणारी इलेक्ट्रिक मशिन्स.
  • प्रतिबंधित गुटखा: विमल, व्हि-१, होला कंपनीचा सुगंधित तंबाखू आणि पान मसाला पाकिटे.

मानवी जीविताशी खेळ

​आरोपी हे संगनमताने मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बनावट दारू तयार करत होते. तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायदा, दारूबंदी कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमान्वये समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

​ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. मानवतकर, पो.उपनि. बालाजी लालपालवाले, राहुल इटेकर आणि एलसीबीच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या