वडगाव: दिवंगत कर्मचारी सागर कडू यांच्या कुटुंबाला १ लाखाची आर्थिक मदत; 'मदत नव्हे कर्तव्य' भावनेतून ढोरे कुटुंबाचा पुढाकार
वडगाव मावळ (प्रतिनिधी): अमोल जाधव
वडगाव नगरपंचायतचे कर्मचारी सागर कडू यांचे गेल्या महिन्यात आकस्मिक निधन झाले. या दुःखद प्रसंगामुळे कडू कुटुंबावर कोसळलेल्या आर्थिक संकटात त्यांना आधार देण्यासाठी वडगाव नगरपंचायत प्रशासन आणि माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत 'मदत नव्हे कर्तव्य' या भावनेतून सुमारे १ लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
नगराध्यक्षा अबोलीताई मयूर ढोरे यांच्या हस्ते ही मदत सागर कडू यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी दिवंगत सागर कडू यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पत्नीला नोकरी आणि शासकीय मदतीचे आश्वासन
केवळ आर्थिक मदत करून न थांबता, नगराध्यक्षा अबोलीताई ढोरे यांनी कडू कुटुंबाला मोठा दिलासा दिला आहे. "कै. सागर कडू यांच्या पत्नीला नगरपंचायत प्रशासनात लवकरात लवकर कामावर रुजू करून घेण्यात येईल," असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, शासनाकडून मिळणारी इतर सर्व मदत मिळवून देण्यासाठी नगरपंचायत प्रशासन पूर्ण ताकदीने पाठपुरावा करेल, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
उपस्थित मान्यवर
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, सचिन कडू तसेच वडगाव नगरपंचायतीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सागर कडू हे आपल्या कामाप्रती अत्यंत कर्तव्यदक्ष होते, अशा भावना यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
नगरपंचायत प्रशासन आणि ढोरे परिवाराने दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या