सचिन हाडके (जिल्हा प्रतिनिधी)
वर्धा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराला वर्धा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
दिलेर सिंग ऊर्फ हड्डी नेपालसिंग बावरी (२५ वर्ष), रा. शिखबेडा, वर्धा असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. या आरोपीच्या गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी सावंगी मेघे पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा उपविभागीय दंडाधिकारी (SDM) कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता.
तडीपारीचा आदेश आणि अंमलबजावणी:
वर्धा येथील माननीय उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१)(अ) अन्वये आरोपीला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले. आदेशाची तातडीने अंमलबजावणी करत, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याला तडीपारीच्या कालावधीसाठी कळमेश्वर येथे सोडून दिले आहे.
कोणाच्या मार्गदर्शनात झाली कारवाई?
ही धडक कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत सावंगी मेघे पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पीएसआय नबी शेख आणि पोलीस हवालदार संजय पंचभाई यांच्यासह अनिल वैद्य, सचिन घेवंदे, सरोज पाली, हर्षद मुन, निखिल फुटाणे, अमोल जाधव आणि दुर्गा ठग या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे इतर सराईत गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असून, परिसरातून पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या