थकीत वेतन न मिळाल्यास घंटागाड्यांची चाके थांबणार: स्वतंत्र मुन्सिपल कंत्राटी कामगार युनियनचा इशारा
सचिन हाडके (जिल्हा प्रतिनिधी)
हिंगणघाट:
येथील नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आणि कंत्राटदाराच्या मनमानीमुळे कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून वेतन थकीत असल्याच्या निषेधार्थ, स्वतंत्र मुन्सिपल कंत्राटी कामगार युनियन (शाखा-हिंगणघाट) च्या वतीने सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ पासून 'आक्रोश आंदोलन' छेडण्यात आले आहे. यावेळी सर्व कामगारांनी हाताला काळ्या फिती लावून नगरपरिषद प्रशासन व कंत्राटदाराचा तीव्र निषेध नोंदवला.
मुख्य मागण्या आणि संताप:
कामगारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शहराची स्वच्छता राखण्याचे काम केले आहे. मात्र, मायबाप नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराने कामगारांच्या हक्काच्या पगाराकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ वेतनच नाही, तर इतरही अनेक न्याय्य मागण्या प्रलंबित असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
"आम्ही रात्रंदिवस शहर स्वच्छ ठेवतो, पण आमच्या घरात चूल पेटवण्यासाठी पैसे नाहीत. चार महिने पगार न होणे हा आमच्यावर अन्याय आहे. जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर शहराची स्वच्छता व्यवस्था कोलमडण्यास सर्वस्व प्रशासन जबाबदार असेल."
सुमित बागेश्वर— युनियन प्रवक्ता, हिंगणघाट.
जनतेला सहकार्याचे आवाहन:
युनियनच्या वतीने हिंगणघाटकर जनतेला नम्र विनंती करण्यात आली आहे की, "आम्ही शहरवासीयांच्या आरोग्यासाठी काम करतो, आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या या न्याय्य लढ्यात जनतेने आम्हाला सहकार्य करावे."
प्रशासनाला शेवटचा इशारा:
जर येत्या काही दिवसांत थकीत वेतन आणि इतर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आगामी काळात शहरातील घंटागाडी आणि ट्रॅक्टरची चाके थांबवण्यात येतील, असा स्पष्ट इशारा कामगारांनी दिला आहे. यामुळे शहरात कचऱ्याची समस्या उद्भवल्यास त्याला सर्वस्वी मुख्याधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार राहतील.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या