Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

काँग्रेसला मोठा धक्का! वर्ध्यातील शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी

 



पक्षाला अंधारात ठेवून विधान परिषदेची उमेदवारी मागे घेतल्याने कडक कारवाई; प्राथमिक सदस्यत्वही रद्द

विशेष प्रतिनिधी (वर्धा): आशिष अंबादे 

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर विदर्भाच्या राजकीय वर्तुळात एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. पक्ष नेतृत्वाला पूर्णपणे अंधारात ठेवून विधान परिषद निवडणुकीतून आपली उमेदवारी अनपेक्षितपणे मागे घेतल्याबद्दल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने वर्ध्यातील ज्येष्ठ नेते शैलेश अग्रवाल यांच्यावर निलंबनाची मोठी कारवाई केली आहे. पक्षाने शिस्तभंगाचे पाऊल उचलत त्यांचे प्राथमिक सदस्यत्व तातडीने रद्द केले आहे.

नेमका काय आहे प्रकार?

​'वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली' स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने शैलेश अग्रवाल यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अग्रवाल यांनी पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा न करता किंवा कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक आपली उमेदवारी मागे घेतली.

​ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारानेच माघार घेतल्यामुळे काँग्रेस पक्षासमोर मोठी राजकीय अडचण निर्माण झाली असून, विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने कारवाई

​शैलेश अग्रवाल यांच्या या धक्कादायक निर्णयाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या थेट आदेशानुसार ही कठोर कारवाई करण्यात आली.

​"पक्ष शिस्तीचा भंग करणे आणि ऐन निवडणुकीत पक्षाला अडचणीत आणणे खपवून घेतले जाणार नाही," असा कडक संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.


अधिकृत पत्र जारी

​महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार, शैलेश अग्रवाल यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व तातडीच्या प्रभावाने रद्द करण्यात आले आहे.

​ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसने घेतलेल्या या धडक निर्णयामुळे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भाच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, याचे आगामी काळात काय राजकीय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या