मोफत पाणी टँकरची सुविधा जाहीर; युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू
वडगाव, मावळ (प्रतिनिधी : अमोल जाधव) :
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वडगाव कातवी परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून रस्त्यांचे नुकसान, ड्रेनेज लाईन तुंबणे आणि पाणीपुरवठा खंडित होण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी तातडीने रस्त्यावर उतरले आहेत. नगराध्यक्षा अबोलीताई ढोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे आणि नगरपंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश दिले.
🚨 प्रशासनाचे महत्त्वाचे निर्णय आणि उपाययोजना:
- १० दिवसांचे विशेष अभियान: शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील दहा दिवस सर्व ड्रेनेज लाईनची साफसफाई, चेंबर दुरुस्ती आणि खराब रस्त्यांची डागडुजी युद्धपातळीवर केली जाईल.
- पाणीपुरवठा स्थिती: जांभूळ जॅकवेल येथील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. संस्कृती व शिंदे टेकडी जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्या भरल्यानंतर उद्या सकाळपासून नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.
- येथे पाणीपुरवठा तात्पुरता बंद: सांगवी येथे विजेचा खांब (लाईट पोल) तुटल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे. तसेच जांभूळ धरणाची पातळी वाढल्यामुळे आणि कातवी पाणीपुरवठा योजनेचे मुख्य व्हॉल्व्ह पाण्याखाली गेल्याने या भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
🚰 नागरिकांसाठी मोफत टँकर सुविधा
"पूरस्थिती आणि तांत्रिक अडचणींमुळे निर्माण झालेली पाण्याची टंचाई लक्षात घेता, परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत नागरिकांसाठी मोफत पाणी टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर जपून करावा आणि विनाकारण घराबाहेर पडू नये."
— अबोलीताई ढोरे (नगराध्यक्षा, वडगाव)
अधिकारी व कर्मचारी मैदानावर
सध्या नगरपंचायतीचे सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानावर उतरून मदत आणि दुरुस्तीची कामे करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला प्रशासनाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या