Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

हरवलेला अवनीश परतला घरी! हिंगणघाट ११२ पथकाच्या तत्परतेने भावनिक पुनर्मिलन

 



हिंगणघाट (विशेष प्रतिनिधी): सचिन हाडके

कुटुंबापासून तब्बल एक महिना दूर राहिलेला उत्तर प्रदेश येथील २१ वर्षीय युवक अवनीश ओमप्रकाश प्रजापती हा अखेर सुखरूप आपल्या घरी परतला आहे. या सुखरूप आणि भावनिक पुनर्मिलनामागे हिंगणघाट पोलीस विभागातील आपत्कालीन 'डायल ११२' पथकाची सतर्कता आणि तत्परता कारणीभूत ठरली आहे. महिनाभरानंतर आपल्या काळजाच्या तुकड्याला सुखरूप बघून आई आणि बहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

​उपचारादरम्यान झाला होता बेपत्ता

​उत्तर प्रदेश राज्यातील कौशंबी जिल्ह्यातील टेनशा गावचा रहिवासी असलेला २१ वर्षीय अवनीश प्रजापती हा एक महिन्यांपूर्वी अचानक घरातून बेपत्ता झाला होता. अवनीशच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याची आई आणि बहीण रोजनदारीवर मजूर म्हणून काम करतात. अवनीश हा घरात मोठा मुलगा असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. याच उपचारादरम्यान तो अचानक घरातून निघून गेला. कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दिली होती, मात्र बराच काळ शोध घेऊनही निराशाच हाती येत होती. मुलगा कुठे असेल, काय खात असेल, या चिंतेने आई आणि बहिणीची झोप उडाली होती.

​'मरोठी हॉस्पिटल'चे कर्मचारी अन् पोलिसांची तत्परता

​घरून निघाल्यानंतर कधी ट्रकने तर कधी रेल्वेने प्रवास करत अवनीश अखेर महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात येऊन पोहोचला. दिनांक ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तो हिंगणघाट येथील मरोठी हॉस्पिटलसमोर संशयास्पद रित्या फिरताना दिसला. येथील कर्मचारी मयूर मरसकोल्हे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांच्या 'डायल ११२' वर संपर्क साधला.

​माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या डायल ११२ पथकातील कर्मचारी प्रवीण बोधाने, स्वप्निल जीवने आणि सागर समृतवार अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अवनीशला सुरक्षित ताब्यात घेतले आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हिंगणघाट येथील बेघर निवारण केंद्रात आश्रय दिला.

​असा लागला कुटुंबाचा शोध

​अवनीशला सुरक्षित ठिकाणी ठेवल्यानंतर ११२ पथकाने मोबाईल आणि विविध तांत्रिक संपर्काच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील त्याच्या कुटुंबाचा शोध सुरू केला. अनेक प्रयत्नांनंतर अखेर कुटुंबाशी संपर्क साधण्यात पोलिसांना यश आले. मुलगा सुखरूप असल्याची बातमी मिळताच आई आणि बहिणीचा जीव भांड्यात पडला.

​आनंद गगनात मावेनासा!

​हिंगणघाट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या उपस्थितीत अवनीशला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. महिनाभरानंतर आपल्या मुलाला डोळ्यासमोर पाहून आणि त्याला मिठीत घेताना आई-बहिणीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. उपस्थित असलेल्या प्रत्येकाचेच डोळे या भावनिक क्षणाने पाणावले.

यांचे लाभले मोलाचे योगदान:

ही यशस्वी मोहीम वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. सुशीलकुमार नायक यांच्या निर्देशाप्रमाणे आणि हिंगणघाटचे ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात ११२ पथकाचे प्रमुख प्रवीण बोधाने, स्वप्निल जीवने, सागर समृतवार तसेच हिंगणघाट पोलीस कर्मचारी आणि बेघर निवारण केंद्राचे संचालक दिनेश वर्मा यांचे मोलाचे योगदान राहिले. अवनीशच्या कुटुंबीयांनी हिंगणघाट पोलीस आणि मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या