Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

डिजे, डॉल्बी व लेझर किरणांवर बंदी घाला: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी



  • विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध
  • जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर

वर्धा 

सर्व जाती-धर्माच्या सण आणि उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या कर्कश डिजे, डॉल्बी आणि मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या लेझर किरणांवर वर्धा जिल्ह्यात त्वरित व कायमस्वरूपी बंदी आणावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने (मंअंनिस) करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन वर्ध्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

​सर्वसामान्याचे आरोग्य, वाढते ध्वनिप्रदूषण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे होणारे उल्लंघन लक्षात घेता प्रशासनाने यावर कडक कारवाई करावी, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे.

विवेकी विचारांवर हल्ला हा लोकशाहीचा अपमान

पुण्यात डॉल्बीच्या वापराला विरोध करत पर्यावरणपूरक भूमिका मांडणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या मारहाणीचा अंनिसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, देशाच्या इतिहासात अनिष्ट प्रथा आणि रूढींना प्रश्न विचारणाऱ्या विवेकी आवाजांना हिंसेने गप्प करण्याचे प्रयत्न वारंवार झाले आहेत. गौतम बुद्ध, महात्मा जोतीराव फुले, महात्मा गांधी यांच्यापासून ते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यापर्यंत हा हिंसक प्रवाह दिसून येतो.

विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याऐवजी हिंसेचा आधार घेणे ही विवेकविरोधी मानसिकता असून, बापट यांच्यावरील हल्ला हा लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अपमान आहे, असे समितीने म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या हल्ल्यातील दोषींची त्वरित ओळख पटवून त्यांना अटक करावी आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. विवेकी नागरिकांना संरक्षण देणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे.

संविधानात्मक कर्तव्यातून प्रबोधन

संविधानाने दिलेल्या धर्म आणि उपासना स्वातंत्र्याचा अंनिस आदर करते. मात्र, उत्सवांच्या नावाखाली होणारे पर्यावरणाचे नुकसान आणि ध्वनिप्रदूषण रोखणे हे नागरिक म्हणून घटनात्मक कर्तव्य आहे. येणाऱ्या सण-उत्सवांच्या काळात डिजे, डॉल्बी व लेझर किरणांचा वापर थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, असे आवाहन समितीने केले आहे.

शिष्टमंडळाची उपस्थिती

निवेदन देताना अंनिसचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, शहर शाखा उपाध्यक्ष अशोक हेडावू, शालेय विवेक वाहिनीचे जिल्हा कार्यवाह दिलीप गुळघाणे, तसेच कार्यकर्ते विकास पाटील, बबिता नेगी, चंद्रशेखर कुंभारे, घनश्याम गोखे, दिलीप राईकवार आणि प्रवीण जारी आदी उपस्थित होते.

वार्ताहर / वृत्तसंकलन: अर्पित वाहाणे (मो. ८९५६६४७००४)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या