गरीबांच्या झोपड्यांवर नाही, त्यांच्या स्वप्नांवर अतिक्रमण करू नका — एमआयएम जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांचा प्रशासनाला इशारा
वर्धा (प्रतिनिधी, अर्पित वाहाणे : ८९५६६४७००४):
शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान गरीब, गरजू नागरिक, हातगाडीधारक, छोटे दुकानदार आणि रोजंदारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी एमआयएमचे वर्धा जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न हा केवळ रस्ते किंवा जागेचा नसून, त्यामागे शेकडो गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जोडलेला आहे. अनेक छोटे व्यावसायिक, फेरीवाले, हातगाडीधारक आणि फुटपाथवर व्यवसाय करणारे नागरिक अत्यंत कष्टाने आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. अशा नागरिकांवर अचानक कारवाई झाल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते.
"ज्यांच्याकडे आधीपासून सर्व काही आहे, त्यांच्यासाठी थोडे नुकसान सहन करणे सोपे असेल; मात्र गरीबाची रोजीरोटी हिरावून घेणे म्हणजे त्याच्या संपूर्ण कुटुंबाची आशा मारण्यासारखे आहे," असे आसिफ खान म्हणाले. त्यामुळे कारवाईपूर्वी संबंधित नागरिकांची आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक जबाबदारी आणि व्यवसायावर होणारा परिणाम यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कारवाई करताना कायदा, न्याय आणि माणुसकीची भावना जपणे आवश्यक असून नियम सर्वांसाठी समान असावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ गरीब आणि छोट्या व्यावसायिकांना लक्ष्य करून मोठ्या किंवा प्रभावशाली व्यक्तींना वेगळा न्याय देणे अयोग्य असून प्रशासनाने पारदर्शक आणि भेदभावमुक्त पद्धतीने पावले उचलावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
प्रशासनाने कारवाईपूर्वी पूर्वसूचना द्यावी, परिस्थिती समजून घ्यावी आणि शक्य असल्यास पर्यायी जागेची किंवा योग्य पुनर्वसनाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. हातातील रोजगार हिरावून घेऊन केवळ अतिक्रमण हटवणे हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. शहराचा विकास आणि वाहतुकीची शिस्त याला विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली गरीबांच्या हक्कांवर अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
"गरीबांच्या झोपड्यांवर नाही, त्यांच्या स्वप्नांवर अतिक्रमण करू नका. गरीबांचा हक्क व रोजीरोटी वाचवा आणि माणुसकी जपा. कायद्याच्या चौकटीत कारवाई करा; मात्र अन्यायकारक आणि एकतर्फी कारवाई आम्ही सहन करणार नाही. गरीब, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी एमआयएम वर्धा जिल्हा सातत्याने आवाज उठवत राहील."
— आसिफ खान (जिल्हाध्यक्ष, एमआयएम, वर्धा

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या