अकोला (विशेष प्रतिनिधी): अर्पित वाहने
अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर करून शासकीय योजना, बोगस बियाणे-खत कंपन्यांशी संगनमत आणि मागासवर्गीय घटक योजनांच्या निधीत कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहाय्यक प्रशासकीय कृषी अधिकारी संजय मांगीलाल राठोड आणि जिल्हा कृषी अधिकारी मुरली बाबुराव इंगळे यांना तात्काळ शासकीय सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी कडक तक्रार सम्राट अशोक सेनेचे प्रदेशाध्यक्ष आकाश दादा शिरसाट व शेतकरी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अमरावती विभागाचे मा. विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे.
बोगस बियाणे हप्तेखोरी व दुबारा पेरणीचे संकट
अकोला जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून अप्रमाणित व बोगस बियाणे आणि खत पुरवठादार कंपन्यांवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांची लाच आणि हप्ते स्वीकारल्याचा प्रबळ संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी हजारांहून अधिक तक्रारी येऊनही कोणतीही कारवाई न केल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे गंभीर आर्थिक संकट ओढवले.
बोगस देयके व कोट्यवधींची बेनामी संपत्ती
मागासवर्गीय घटक योजना तसेच कृषी विकास निधीमध्ये बोगस देयके (Fake Bills) व खोटी कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांचा शासकीय निधी परस्पर हडपल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराच्या या पैशातून संबंधित अधिकाऱ्यांनी अकोला, अमरावती, नागपूर, पुणे व मुंबई यांसारख्या शहरांमध्ये स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावे कोट्यवधींची बेनामी मालमत्ता जमवल्याचा दावा करत या सर्व संपत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
RTI कार्यकर्त्याचा छळ
हा घोटाळा माहितीच्या अधिकारात (RTI) उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला असता, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून सूडबुद्धीने खोट्या तक्रारी नोंदवून RTI कार्यकर्त्याचा छळ केल्याचा गंभीर आरोपही आकाश शिरसाट यांनी केला आहे.
तक्रारदारांच्या मुख्य मागण्या:
- तात्काळ निलंबन: 'महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९' च्या नियम ४ अन्वये पुरावे नष्ट होण्यापूर्वी संजय राठोड व मुरली इंगळे यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे.
- विभागीय व ACB चौकशी: प्रकरणाची उच्चस्तरीय त्रिसदस्यीय विभागीय चौकशी समिती गठीत करावी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) व पोलीस विभागाकडे चौकशी वर्ग करून गुन्हे दाखल करावेत.
तीव्र जनआंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई न केल्यास पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर कठोर पावले न उचलल्यास सम्राट अशोक सेना आणि अकोला जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडेल, असा थेट इशारा आकाश दादा शिरसाट यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या