रोशनी नॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार जाहीर; इंझाळा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
हिंगणघाट / संभाजीनगर: सचिन हाडके
हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा येथील तरुण पत्रकार, गीतकार व निर्माता अश्विन बोदाडे यांच्या ‘झूठा इश्क’ या अल्बमची रोशनी नॅशनल फिल्म फेस्टिव्हलतर्फे दखल घेण्यात आली असून, त्यांना 'बेस्ट अल्बम अवॉर्ड' (म्युझिकल अवॉर्ड) देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
अश्विन बोदाडे यांनी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत पत्रकारितेसोबतच कला क्षेत्रातही आपली आवड जोपासली आहे. विविध अडचणी व संकटांवर मात करत त्यांनी स्वतःच्या गीतलेखनातून ‘झूठा इश्क’ या अल्बमची निर्मिती केली. संभाजीनगर येथे आयोजित रोशनी नॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या अल्बमच्या कलात्मक गुणवत्तेची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
'झूठा इश्क’ या अल्बममधील गीतांना रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, ही गीते ‘उडान एक सोच’ तसेच ‘अश्विन बोदाडे’ या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करण्यात आली आहेत. या यशोगाथेनंतर त्यांचा ‘तुझ्या प्रेमाला भावपूर्ण श्रद्धांजली’ हा आगामी अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अल्बमचे मुख्य कलाकार व तंत्रज्ञ:
- गीतकार व निर्माता: अश्विन बोदाडे
- संगीत: स्वरसांज
- फोटो एडिटिंग: प्रियाशु शंभरकर
- व्हिडिओ एडिटिंग: रोहित पाटील
रोशनी नॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे संचालक तुषार थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात देश-विदेशातील चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते व मान्यवर उपस्थित होते. अश्विन बोदाडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल चित्रपट अभिनेता विजय कुमार खंडारे (अमरावती), अभिनेत्री शिप्रा तेलगे (वर्धा), नव स्वराज न्यूज, युवा पत्रकार संघटना, डिजिटल पत्रकार संघटना, तसेच इंझाळा ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या