विशेष प्रतिनिधी / अर्पित वाहाणे (मो. ८९५६६४७००४)
नागपूर, दि. २२ सप्टेंबर २०२६:
ईएसआयसी रुग्णालय, सोमवारीपेठ, नागपूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ अवयवदान व रक्तदान जनजागृती शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले। वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात सुमारे ५० रुग्णांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला।
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हर्षवर्धन कांबळे उपस्थित होते। प्रमुख वक्त्या डॉ. मीनल खरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रक्तदानाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे विशद केले। रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचवण्यास मदत होते, त्यामुळे प्रत्येकाने नियमित रक्तदान केले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले।
यानंतर डॉ. सुश्रुत सावकार यांनी अवयवदानाविषयी सविस्तर माहिती दिली। अवयवदानामुळे अनेक गंभीर रुग्णांना नवीन जीवन मिळू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले।
याप्रसंगी रुग्णालयातील परिचारिका उर्मिला भलावी यांनी मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा संकल्प जाहीर केला। त्यांच्या या निर्णयामुळे एखाद्या दृष्टिहीन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होणार असून, उपस्थितांमध्ये अवयवदानाविषयी जनजागृतीचा प्रेरणादायी संदेश गेला।
अध्यक्षीय भाषणात डॉ. हर्षवर्धन कांबळे यांनी अवयवदानाची कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया स्पष्ट करत जास्तीत जास्त नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले।
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन डॉ. फैजान जौवाद खान व डॉ. प्रणय चांदेकर यांनी केले। या प्रसंगी निराशा सिस्टर, देवकमण्या, विनोद वाल्मिकी, मिलिंद, सोनू, अल्केश यांच्यासह रुग्णालयातील इतर कर्मचारी व वैद्यकीय वर्ग उपस्थित होता।
समाजात रक्तदान आणि अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता।
"रक्तदान हे जीवनदान, तर अवयवदान हे नवजीवनाचे वरदान!"

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या