AIMIM चे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन; दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा
वर्धा (विशेष प्रतिनिधी): अर्पित वाहणे
वर्धा शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाचे मागील दोन वर्षांपासून रखडलेले नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून खेळाडूंसाठी सर्व क्रीडा सुविधा पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, या मागणीसाठी AIMIM वर्धा जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांच्या नेतृत्वात आज जिल्हा क्रीडा अधिकारी, वर्धा यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा क्रीडा संकुल हे वर्धा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडू आणि युवकांसाठी एक महत्त्वाचे क्रीडा केंद्र आहे. मात्र, नूतनीकरणाचे काम सुरू होऊन सुमारे दोन वर्षांचा कालावधी उलटूनही ते अद्याप अपूर्णच आहे. सध्या काही प्रमाणात काम सुरू असले तरी त्याची गती अत्यंत संथ आहे. त्यामुळे खेळाडूंना रोजच्या सरावासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यातील अनेक खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु, जिल्ह्यातील प्रमुख क्रीडा सुविधा दीर्घकाळापासून बंद असल्याने खेळाडूंना सरावासाठी इतर ठिकाणी भटकावे लागत आहे. परिणामी त्यांचा वेळ व आर्थिक खर्च वाढत असून सरावावरही विपरीत परिणाम होत असल्याचे AIMIM ने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
- कामास गती: जिल्हा क्रीडा संकुलाच्या नूतनीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे.
- अंतिम तारीख: काम पूर्ण करण्याची निश्चित अंतिम मुदत (Dead Line) जाहीर करावी.
- पारदर्शकता: विलंबाची कारणे स्पष्ट करून मंजूर निधी व आतापर्यंत झालेल्या खर्चाची माहिती सार्वजनिक करावी.
- गुणवत्ता तपासणी: सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेची वरिष्ठ स्तरावरून तपासणी व्हावी.
- पर्यायी व्यवस्था: काम पूर्ण होईपर्यंत खेळाडूंच्या सरावासाठी तातडीने पर्यायी क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देऊन काम आणखी लांबणीवर पडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना AIMIM जिल्हाध्यक्ष आसिफ खान म्हणाले की, "प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन खेळाडूंच्या हितासाठी ठोस कार्यवाही करावी. जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर AIMIM च्या वतीने खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
निवेदन देताना AIMIM वर्धा जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आवेज शेख, वर्धा शहर सचिव राजिक खान, जलील शेख यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृत्त संकलन / बातमीदार: अर्पित वाहाणे (मो. 8956647004)

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या