Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

‘जेन झी’ला वाचनाकडे प्रवृत्त करणारे साहित्य निर्माण झाले: मा. जगदीश ओहोळ

 



​वर्धा (विशेष बातमीदार): अर्पित वाहणे 

"आजच्या युगात युवा पिढी वाचन करत नाही असा सूर सर्वत्र उमटत असताना, तरुणाईला आकर्षित करेल आणि त्यांना वाचनास प्रवृत्त करेल अशा साहित्याची गरज आहे. 'जग बदलणारा बाप माणूस' हे पुस्तक तरुणांना वाचनाची आवड निर्माण करणारे ठरत आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक माननीय जगदीश ओहोळ यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) शाखा व जिल्हा वर्धा यांच्या वतीने आयोजित 'वाचू या समृद्ध होऊ या' या ऑनलाईन उपक्रमात ते बोलत होते.

​मा. जगदीश ओहोळ पुढे म्हणाले की, "या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाला दिलेले नाव तरुणाईला आकर्षित करणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कष्ट, त्याग, आंदोलने आणि वैचारिक समृद्धी संदर्भासहित मांडल्यामुळे बाबासाहेब कसे खऱ्या अर्थाने 'विश्वभूषण' आहेत, हे यात स्पष्ट होते. यामुळेच हे पुस्तक लोकप्रिय झाले असून आतापर्यंत याच्या ९० आवृत्त्या निघाल्या आहेत. याची नवी आवृत्ती धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूर येथे प्रकाशित होणार आहे." प्रभावी लिखाण माणसाला जगण्याचे धैर्य देते आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

​महाराष्ट्र अंनिसतर्फे चालवला जाणारा 'वाचू या समृद्ध होऊ या' हा ऑनलाईन वाचन उपक्रम ९ डिसेंबर २०२० पासून दररोज सायंकाळी ६ वाजता अखंडपणे सुरू आहे. या उपक्रमात आतापर्यंत ६२ पुस्तकांचे वाचन पूर्ण झाले असून १३ लेखकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे. हा संपूर्ण भारतातील एकमेव व अद्वितीय उपक्रम असावा, अशा शब्दांत ओहोळ यांनी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

​कार्यक्रमात नियमित उपस्थित असणाऱ्या लताताई गजभिये (दर्यापूर), प्राची काकडे, सुकन्या वाळके, सोनाली (सिंधुदुर्ग), रजनी मेंढे, स्नेहल थोटे, साहिल रामटेके, तक्षणा लोहकरे व प्रणाली धाबर्डे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून श्रोत्यांना पुस्तकाचे महत्त्व पटवून दिले.

​कार्यक्रमाची सुरुवात सुकन्या वाळके यांच्या 'बुद्ध, कबीर, भीमराव फुले या भूमीवर जन्मले...' या गीताने झाली. प्रास्ताविक शंकर श्रीरामे यांनी केले, तर लेखक जगदीश ओहोळ यांचा परिचय कांचन रूपवणे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना सातव यांनी केले. महाराष्ट्रातून ७९ अभ्यासू श्रोत्यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर कविता राठोड यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली, अशी माहिती डॉ. माधुरी झाडे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या