Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

'महाराष्ट्र भूषण' गजेंद्र सुरकार यांचा वर्धेत निवृत्त अभियंता फोरम तर्फे सत्कार

 

​


​वर्धा (विशेष प्रतिनिधी): अर्पित वाहणे 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांना नुकताच 'महाराष्ट्र भूषण सम्मान' प्राप्त झाल्याबद्दल, वर्धा जिल्हा निवृत्त अभियंता फोरमच्या वतीने न्यू स्टेट बँक कॉलनी येथील संत नामदेव महाराज सभागृहात एका विशेष कार्यक्रमात त्यांचा भावूक सत्कार करण्यात आला. सर्व सदस्यांच्या उपस्थितीत माजी अभियंता व ज्येष्ठ गांधीवादी डॉ. भरत महोदय यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सुरकार यांचा गौरव करण्यात आला.

​याप्रसंगी मंचावर माजी अभियंता फोरमचे अध्यक्ष अनिल मुरडीव, सचिव रवींद्र कडू, माजी अभियंता फरसोले, दत्तात्रय शुक्ला आणि लोखंडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

​सत्काराला उत्तर देताना गजेंद्र सुरकार म्हणाले, "आपल्या जवळच्या माणसांकडून आणि परिचित व्यक्तींकडून जेव्हा असा सत्कार होतो, तेव्हा तो इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचा वाटतो. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातूनच माझे व्यक्तिमत्त्व घडले, वाचनाचा छंद जडला आणि समाजाकडून खूप काही शिकायला मिळाले. अनेक साथीदार व हितचिंतकांची खंबीर साथ मिळाल्यामुळेच मी या चळवळीला पूर्ण वेळ देऊ शकलो."

​कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, श्रद्धा-अंधश्रद्धा, रितीरिवाज, समाज विवेकी कसा होईल आणि विविध उपक्रम या विषयांवर खुलेपणाने प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना सुरकार यांनी शास्त्रीय व विवेकी आधारावर उत्तरे देऊन उपस्थितांचे शंकासनिरसन केले.

​प्रारंभी गजेंद्र सुरकार यांची ओळख करून देताना अनिल मुरडीव यांनी, सुरकार यांना आतापर्यंत मिळालेले शासकीय व सामाजिक पुरस्कार, तसेच पुरस्कारांच्या रकमेची मुदतठेव (Fixed Deposit) करून त्या व्याजातून गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांना केली जाणारी शैक्षणिक मदत या सामाजिक बांधिलकीची विशेष नोंद घेतली.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव रवींद्र कडू यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रकाश वानखेडे यांनी मानले. या सोहळ्याला निवृत्त अभियंता फोरमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या