- विशेष बातमीदार | औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
- दिनांक: ३० सप्टेंबर २०२६
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी स्वाधार योजनेची अर्ज करण्याची मुदत वाढवून पात्र विद्यार्थ्यांना लाभाची संधी द्यावी, अशी मागणी आझाद समाज पार्टी (कांशीराम) च्या वतीने समाज कल्याण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी तसेच कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे वेळेत अर्ज करू न शकलेले अनेक पात्र विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जासाठी तातडीने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच मुदतवाढीची माहिती सर्व महाविद्यालये व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मदत उपलब्ध करून द्यावी आणि केवळ मुदत संपल्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी मराठवाडा अध्यक्ष शिवाजी वीर, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे आणि युवा जिल्हा सचिव सागर अंभोरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून स्वाधार योजनेची मुदत तातडीने वाढविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रतिनिधी / वृत्तसेवा संपर्क:
- अर्पित वाहाणे (मो. ८९५६६४७००४)
- विजय देवराव शिनगारे - जिल्हाध्यक्ष, आझाद समाज पार्टी (का), छ. संभाजीनगर

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या