ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला ‘डिजिटल’ जीवनदान देण्यासाठी ‘जन शिक्षण स्वाभिमान आंदोलना’चे निवेदन!
९ जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक शैक्षणिक सुविधा पुरवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
वर्धा / आर्वी: अर्पित वाहणे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी 'जन शिक्षण स्वाभिमान आंदोलना'च्या वतीने आज मा. जिल्हाधिकारी, वर्धा तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा यांना महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले.
तालुक्यातील दहेगाव (मुस्तफा), कवाडी, गव्हाणखेडी, पाचेगाव, बोरगाव (हातला), पिपरी, पारगोठाण, धनोडी आणि सावंगी या ९ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल शिक्षण मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
केवळ डिजिटल बोर्ड नव्हे, तर प्रत्यक्ष तंत्रज्ञानाचा अनुभव!
निवेदनात नमूद केल्यानुसार, शाळांमध्ये केवळ डिजिटल बोर्ड बसवण्यापुरती ही मागणी मर्यादित नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष डिजिटल पद्धतीने शिकता यावे यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये:
- स्मार्ट डिजिटल क्लासरूम आणि इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड
- वेगवान इंटरनेट सुविधा
- डिजिटल शैक्षणिक कंटेंट व ई-लर्निंग सामग्री
- AI आधारित शैक्षणिक साधने, संगणक व डिजिटल लॅब
- प्रोजेक्टर, ऑडिओ-व्हिज्युअल शिक्षण व ई-लायब्ररी
- शिक्षकांसाठी विशेष डिजिटल प्रशिक्षण
शहरी आणि ग्रामीण दरी मिटवण्याचा संकल्प
"आज गावातील विद्यार्थी मोबाईलच्या माध्यमातून जग पाहतो, परंतु शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शिकण्याची संधी मिळत नसेल तर ही दरी आपण कधी भरून काढणार?" असा सवाल या आंदोलनाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये बुद्धिमत्ता आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असून त्यांना योग्य संधीची आवश्यकता आहे. शाळा वाचवणे म्हणजे केवळ इमारत वाचवणे नसून एका संपूर्ण पिढीचे भविष्य वाचवणे आहे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
प्रशासनाकडून ठोस निर्णयाची अपेक्षा
प्रशासनाला निवेदन सादर झाल्यानंतर आता यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक मंजुरी दिली जावी, जेणेकरून ९ शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची दारे खुली होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या