Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

विकासकामांचा प्रश्न उपस्थित केल्याने पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी

 





​आर्वीतील बुद्ध विहार व वाचनालयाच्या प्रलंबित कामांवरून वाद; पत्रकार अर्पित वाहाणे यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार

आर्वी (विशेष प्रतिनिधी): अर्पित वाहने

आर्वी येथील महाराणा प्रताप वॉर्डातील प्रलंबित विकासकामांचा आणि बुद्ध विहाराच्या बांधकामाचा प्रश्न जनसामान्यांसमोर मांडल्याच्या कारणावरून, स्थानिक पत्रकार अर्पित वाहाणे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बीजेपी अनुसूचित जाती अध्यक्ष सागर मोटघरे आणि ऋषी मोटघरे यांनी मानहानीचा दावा ठोकण्याची व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे आपल्या तक्रारीत अर्पित वाहने यांनी नमूद केले आहे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेविरुद्ध स्थानिक नागरिकांसह पत्रकार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नेमका प्रकार काय?

महाराणा प्रताप वॉर्डातील बुद्ध विहार आणि सार्वजनिक वाचनालयाचे काम दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन पत्रकार अर्पित वाहाणे यांनी लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांची आठवण करून देणारी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीमुळे संतप्त झालेल्या सागर मोटघरे व ऋषी मोटघरे यांनी पत्रकार वाहाणे यांना गाठून, “ही बातमी का लावली?” असा जाब विचारत अर्वाच्य भाषा वापरून जिवे मारण्याची थेट धमकी दिल्याचे अर्पित वाहने यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला:

जनतेच्या समस्या आणि विकासकामांचे वास्तव मांडणे हे पत्रकाराचे मूलभूत कर्तव्य आहे. मात्र, जनहितार्थ प्रश्न उपस्थित केल्यामुळे थेट जिवे मारण्याची धमकी देणे हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला थेट हल्ला असल्याची भावना व्यक्त होत आहे. या घटनेमुळे आर्वी तालुक्यात भीतीचे तसेच संतापाचे वातावरण पसरले असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे मनोबल किती वाढले आहे, हेच यावरून दिसून येत आहे.

प्रमुख मागण्या:

  1. ​पत्रकार अर्पित वाहाणे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सागर मोटघरे व ऋषी मोटघरे यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
  2. ​कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.
  3. ​लोकशाहीवादी आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड प्रवृत्तीचा तात्काळ बंदोबस्त करावा.

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव व आंदोलनाचा इशारा:

या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत पत्रकार अर्पित वाहाणे यांनी थेट वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. धमकावणाऱ्या आरोपींवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर या प्रकरणाची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन ठोस कारवाई केली नाही, तर आर्वी तालुक्यातील पत्रकार संघटना व सर्वपक्षीय नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

विशेष बातमीदार: अर्पित वाहाणे (मो. 8956647004)

स्थान: आर्वी (वर्धा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या