अकोला / अमरावती:
अकोला जिल्ह्यातील बोगस बियाणे घोटाळ्याविरोधात आवाज उठवणाऱ्या मागासवर्गीय सामाजिक कार्यकर्त्यावर सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 'सम्राट अशोक सेने'चे राज्यध्यक्ष आकाश दादा शिरसाट यांनी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) यांच्याकडे धाव घेत अकोल्यातील दोन वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायदा व 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या गंभीर कलमांखाली तात्काळ एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी केली आहे.
बनावट अहवाल व खोटी साक्ष तयार केल्याचा गंभीर आरोप
तक्रारीनुसार, अकोला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील सहाय्यक प्रशासकीय कृषी अधिकारी संजय मांगीलाल राठोड आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरली बाबाराव इंगळे यांनी आपसात संगनमत करून खोटा अहवाल तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
खरिपातील बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि यातील भ्रष्टाचाराविरोधात १० जुलै रोजी आकाश शिरसाट यांनी कृषी कार्यालयात लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन केले होते. मात्र, एका आंबेडकरवादी कार्यकर्त्यांने भ्रष्टाचारावर बोट ठेवल्याचा राग मनात धरून, या अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या तब्बल तीन दिवसांनंतर (१३ जुलै) बनावट अहवाल तयार करून शिरसाट यांच्यावर खोटा गुन्हा नोंदवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
शिरसाट यांचे आंदोलन सत्य असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध
ज्या बोगस बियाणे घोटाळ्याविरोधात आकाश शिरसाट यांनी आंदोलन केले होते, त्याच प्रकरणात पुढे १९ जुलै रोजी कृषी विभागाने स्वतः सिटी कोतवाली पोलीस ठाणे, अकोला येथे ११ नामांकित बियाणे कंपन्यांवर (रवी सीड्स, बूस्टर, ईगल आदी) गुन्हा दाखल केला. यावरून शिरसाट यांनी मांडलेला मुद्दा पूर्णपणे सत्य आणि जनहिताचा होता हे सिद्ध झाले आहे, तरीही जातीय द्वेषातून त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
अकोला पोलिसांच्या निष्क्रियतेनंतर अमरावती 'IG' कडे साकडे
याप्रकरणी अकोला पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने, अखेर अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे (IG) दाद मागावी लागल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
'या' गंभीर कलमांनुसार कारवाईची मागणी:
तक्रारीत दोषी अधिकाऱ्यांवर खालील कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे:
- BNS कलम २४८ व २५२: दुसऱ्याचे नुकसान करण्याच्या उद्देशाने बनावट अहवाल व कागदपत्रे तयार करणे.
- BNS कलम २३०: लोकसेवकाने कायद्याचे उल्लंघन करून नागरिकाला बेकायदेशीर संकटात ढकलणे.
- BNS कलम ६१ (२): गुन्हेगारी कट रचणे (Criminal Conspiracy).
- अॅट्रॉसिटी अॅक्ट (SC/ST Act) कलम ३ व ४: अनुसूचित जातीतील व्यक्तीविरुद्ध सूडबुद्धीने खोट्या कारवाया करणे, मानहानी करणे व कर्तव्यात कसूर करणे.
"बोगस बियाणे कंपन्यांशी संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड केल्यामुळे माझ्यावर जातीय द्वेषातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक स्तरावर दाद न मिळाल्याने आम्ही अमरावती आयजींकडे तक्रार केली आहे. जर या दोन्ही अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी व BNS नुसार तात्काळ FIR नोंदवला नाही, तर सम्राट अशोक सेना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र जनआंदोलन छेडेल."
— आकाश दादा शिरसाट (राज्यध्यक्ष, सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र)
(वार्ताहर: अर्पित वाहाणे, मो. ८९५६६४७००४)

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या