AIMIM जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांची CCTV फुटेज तपासण्याची मागणी
वर्धा
वर्धा शहरातील रस्ते, मोठे खड्डे, रखडलेली विकासकामे तसेच नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेलेल्या AIMIM च्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्याच्या कथित अरेरावीचा सामना करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रोहित चंदेले यांनी AIMIM चे वर्धा जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांच्याशी अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी आसिफ खान हे शहरातील नागरी समस्या मांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात गेले होते. लोकशाही मार्गाने समस्या मांडत असताना उपविभागीय अभियंता चंदेले यांनी कथितरित्या अरेरावीचे वर्तन केले. या घटनेच्या निषेधार्थ AIMIM च्या वतीने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा यांच्याकडे निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
CCTV फुटेज तपासून कारवाई करण्याची मागणी
२५ सप्टेंबर रोजी कार्यालयात घडलेल्या या संपूर्ण प्रसंगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी आणि कार्यालयातील CCTV फुटेज तपासून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी ठाम मागणी जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांनी केली आहे. चौकशीत रोहित चंदेले दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करून त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
AIMIM च्या प्रमुख मागण्या:
- प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी.
- २५ सप्टेंबर २०२६ चे संबंधित कार्यालयातील CCTV फुटेज तपासावे.
- गैरवर्तन सिद्ध झाल्यास रोहित चंदेले यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची बदली करावी.
- वर्धा शहरातील मोठे खड्डे व खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
- रखडलेली सर्व विकासकामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत.
आंदोलनाचा इशारा
नागरिकांच्या समस्या मांडणे हा लोकशाहीचा हक्क असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास आचारसंहिता संपल्यानंतर नियमानुसार तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आसिफ खान यांनी दिला आहे. आवश्यकता भासल्यास अनिश्चितकालीन आमरण उपोषण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वृत्त संकलन: अर्पित वाहाणे (मो. ८९५६६४७००४

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या